Ratnagiri Murder : मिरजोळेतील तरुणीचा खून उघडकीस, प्रेयसीचा खून करून प्रियकराकडून मृतदेह दरीत फेकला

रत्नागिरी, दि. ३० : रत्नागिरी तालुक्यातील आंबा घाटात तरुणीचा खून करून तिचा मृतदेह फेकल्याची घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) ही युवती काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा कुटुंबीयांकडून सर्वत्र शोध घेतला जात असतानाच अखेर तिचा मृतदेह आढळून आला.
भक्तीचा परिचय वाटद-खंडाळा येथील दुर्वास दर्शन पाटील (वय २५) याच्यासोबत होता. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच दुर्वास पाटील याने रागाच्या भरात भक्तीचा खून केला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
भक्ती गायब झाल्याप्रकरणी पोलिसांनी दुर्वास याच्याकडे चौकशी सुरू केली होती. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या कसून तपासानंतर अखेर त्याने सत्य कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी उशिरा भक्तीचा मृतदेह आंबा घाटातील दरीतून बाहेर काढला.
या प्रकरणी आरोपी दुर्वास पाटील याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

आणखी वाचा