रत्नागिरी, दि. ०५ (प्रतिनिधी): भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हा नगरवाचनालय, रत्नागिरी येथे शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या भेटीचे आयोजन महाविद्यालयाच्या वाङमय मंडळ अंतर्गत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या शैक्षणिक अभ्यासाचा एक भाग म्हणून वाचनालयामधील कार्यपद्धती, पुस्तकांच्या वर्गीकरणाची प्रक्रिया, आणि वाचनालयाचा सर्वांगीण उपयोग तसेच वाचनाचे महत्व आणि संशोधन प्रक्रियेतील वाचनालयाच्या योगदान बद्दल जागृत करण्यासाठी केले होते.
या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या विविध विभागांबद्दल माहिती देण्यात आली. वाचनालयातील ग्रंथपाल सौ. मीनल हळदणकर व सौ मानसी मराठे तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथसंपदा, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, ईबुक्स आणि डिजिटल संसाधनाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील वर्गीकरण पद्धती जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन आणि संशोधनासाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध पुस्तकांचा असलेल्या सुविधांची पाहणी केली. तसेच विषयावरील पुस्तकांचा अभ्यास केला आणि डिजिटल संसाधनाचा वापर कसा करायचा हे शिकले. विशेष म्हणजे वाचनालयातील डिजिटल ई पुस्तक प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीचा अनुभव घेतला. आणि इंटरनेट द्वारे उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधन साधनांचा उपयोग करून घेतला.
महाविद्यालयाच्या भाषेच्या सहा. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयींच्या फायद्यावर मार्गदर्शन केले. तसेच वाचनालयातील कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या संवादाने विद्यार्थ्यांना वाचन संशोधन आणि लेखन या क्षेत्रात नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली.आणि वाचनालयात उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा शैक्षणिक जीवनात महत्त्वपूर्ण उपयोग कसा होऊ शकतो हे स्पष्ट केले. जिल्हा नगर वाचनालय हे आधुनिक जगाप्रमाणे अपडेट असल्यामुळे व सर्व सुविधा पाहून खूप आनंद व्यक्त केला.
या क्षेत्रभेटीस प्र. प्राचार्या मधुरा पाटील, सहा. प्रा. वसुंधरा जाधव ( इंग्रजी विभाग प्रमुख), हिंदी विभाग प्रमुख सहा. प्रा गौरी बोटके आणि मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. वीणा कोकजे उपस्थित होत्या.
या मधे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे कला शाखेचे सर्व विद्यार्थी तसेच प्रथम वर्ष विज्ञान शाखेचे इंग्रजी विषयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याचे संपूर्ण नियोजन वाङमय विभाग अंतर्गत सर्व भाषा प्रमुखांनी केले होते. या भेटीसाठी जिल्हा नगर वाचनालयचे कार्यवाह श्री. आनंद पाटणकर, ग्रंथपाल सौ. मीनल हळदणकर वं सहाय्यक ग्रंथपाल सौ. मानसी मराठे याचे सहकार्य लाभले. महाविद्यालयच्या वतीने सहा. प्रा. वसुंधरा जाधव यांनी आभार मानले.