जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रत्नागिरीतून पहिला अर्ज दाखल; ॲड. महेश मांडवकर पावस गटातून रिंगणात

रत्नागिरी, दि. १७ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला उमेदवारी अर्ज आज (१७ जानेवारी) दाखल झाला. शिवसेनेचे पावस जिल्हा परिषद गटातील उमेदवार ॲड. महेश मांडवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला.

हा अर्ज पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. महायुतीकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाल्यानंतर लगेचच हा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक वातावरणाला चांगलाच वेग आला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच ॲड. महेश मांडवकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. महायुतीचा विजय निश्चित असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ पैकी ५६ जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेची पहिली उमेदवार यादी

🔺 जिल्हा परिषद गट उमेदवार

खेडशी: सौ. हर्षदा भिकाजी गावडे

मुचरी: माधवीताई गीते

कसबा: रचनाताई राजेंद्र महाडिक

झाडगाव: सौ. श्रद्धा दीपक मोरे

पावस: महेंद्र मांडवकर

खालगाव: महेश उर्फ बाबू म्हाप

गोळप: नंदकुमार मुरकर

वेळणेश्वर: सौ. नेत्राताई नवनीत ठाकूर

पडवे: महेश नाटेकर

🔺 पंचायत समिती उमेदवार

हातखंबा: विद्या विलास बोमले

देवूड: नेहा गावणकर

नाणीज: डॉ. पद्मजा संजय कांबळे

पहिला उमेदवारी अर्ज दाखल होणे आणि शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या काही दिवसांत प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा