रत्नागिरी, दि. ५ (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरालगत खेडशी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तब्बल सात फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांमध्ये एकच खळबळ उडाली. अजगर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना गुळगुळीत सिमेंटच्या रस्त्यावर त्याला पुढे सरकणे कठीण जात असल्याचे दिसून आले.
महालक्ष्मी मंदिरासमोरील नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने रस्त्याच्या मध्यभागी अजगर दिसताच संभाव्य अपघाताची भीती निर्माण झाली. दुचाकीस्वारांसाठी हा प्रसंग अत्यंत धोकादायक ठरू शकला असता.
मात्र, काही सतर्क दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखत तत्काळ आपली वाहने थांबवली आणि समोरून येणाऱ्या वाहनचालकांना इशारा दिला. त्यानंतर वाहनचालकांनी संयम बाळगत अजगराला सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला.
वाहनचालकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावर सावधगिरीने वाहन चालवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.











