रत्नागिरी, दि. २३ : रत्नागिरीतील महत्त्वाच्या मिरकरवाडा बंदरात मत्स्य व्यवसाय विभागाने विनावापर पडून असलेल्या मच्छीमारी नौकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून बंदरात नादुरुस्त अवस्थेत पडून असलेल्या नौका हटविण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.
मिरकरवाडा बंदरात अनेक नौका दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी विनावापर पडून होत्या. त्यामुळे बंदरातील जागेचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच कार्यरत मच्छीमारांच्या नौका लावताना आणि बंदरातील वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने संबंधित नौका मालकांना यापूर्वी नोटिसा बजावून नौका हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्रशासनाकडून तब्बल ३० नौका मालकांना स्वतःहून नौका हटविण्यासाठी अंतिम नोटीस देण्यात आली होती. मात्र, निर्धारित मुदत संपल्यानंतरही अनेक नौका बंदरातून हटविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अखेर मत्स्य विभागाने प्रत्यक्ष कारवाई सुरू करून या विनावापर नौका हटविण्याचे काम हाती घेतले आहे.
दरम्यान, जानेवारी महिन्यात मिरकरवाडा बंदर परिसरातील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. त्यानंतर आता विनावापर नौकांवरही कारवाई सुरू झाल्याने बंदर परिसरातील अनधिकृत अडथळे दूर करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला अधिक वेग आला आहे.
या कारवाईमुळे बंदरातील उपलब्ध जागेचा योग्य वापर होण्यास तसेच कार्यरत मच्छीमारांना नौका लावण्यासाठी आणि वाहतुकीसाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बंदरातील मच्छीमारी व्यवसाय अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.








