रत्नागिरी, दि. १४ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकांअंतर्गत जिल्ह्यात एकूण ५६ जिल्हा परिषद गट आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी मतदान होणार आहे.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुकानिहाय निवडणूक क्षेत्रांची रचना निश्चित करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात २० जिल्हा परिषद गट आणि ४ पंचायत समिती गण, दापोली तालुक्यात ६ गट व १२ गण, खेड तालुक्यात ७ गट व १४ गण, चिपळूण तालुक्यात ९ गट व १८ गण, गुहागर तालुक्यात ५ गट व १० गण, रत्नागिरी तालुक्यात १० गट व २० गण, संगमेश्वर तालुक्यात ७ गट व १४ गण, लांजा तालुक्यात ४ गट व ८ गण, तर राजापूर तालुक्यात ६ जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एकूण १ हजार ६९३ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदानासाठी २ हजार १४३ कंट्रोल युनिट आणि ४ हजार २८६ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निवडणूक यंत्रणेसह कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिनांक १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत राबविण्यात येणार आहे. रविवार, १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी २२ जानेवारी २०२६ रोजी होणार असून त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची संधी २३, २४ आणि २७ जानेवारी २०२६ या दिवशी देण्यात आली आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज माघारी घेण्याची नोटीस स्वीकारली जाणार नाही. २७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडणार असून मतमोजणी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी यावेळी केले.








