रत्नागिरी, दि. ३० : कोकणात मान्सूनने जोरदार पुनरागमन करत रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शंभर मिलिमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनाही घडल्या. दरम्यान, रत्नागिरी शहरासाठी महत्त्वाचे असलेले शीळ धरण १०० टक्के भरल्याने शहराच्या पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागला आहे.
जिल्ह्यात आज एकूण ९५०.३८ मिमी पर्जन्यमान, तर सरासरी १०५.५९ मिमी पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय रत्नागिरीमध्ये १४३.७७ मिमी, गुहागरमध्ये १२७.६० मिमी, मंडणगडमध्ये १२०.२५ मिमी, संगमेश्वरमध्ये ११० मिमी, राजापूरमध्ये १०६.२५ मिमी आणि दापोलीमध्ये १०५ मिमी पाऊस झाला.
दापोलीत धुवाधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
दापोली तालुक्यात आज ३१५ मिमी एकूण, तर ४५ मिमी सरासरी पर्जन्यमान नोंदविण्यात आले. बुरोंडी येथे सर्वाधिक ७४ मिमी, आंजर्ले ५७ मिमी, दाभोळ ४९ मिमी, दापोली व वाकवली येथे प्रत्येकी ४० मिमी पाऊस झाला. या पावसामुळे भात पेरणी व खरीप हंगामाच्या कामांना वेग मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मात्र शहरातील पोस्ट गल्ली परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले. पेडणेकर ज्वेलर्ससमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
दाभोळमध्ये दोन आंब्याची झाडे कोसळली
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे दाभोळमध्ये एका दिवसात दोन मोठी आंब्याची झाडे कोसळली. पहाटे लोकमान्य टिळक विद्यालयाजवळील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली, तर दुपारी गुजर आळी येथे झाड घरावर कोसळून घराचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने दोन्ही घटनांत जीवितहानी टळली. काही भागातील वीजवाहिन्यांनाही फटका बसल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ
खेड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. कमी वेळात झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीची पातळी दुपारी ४.६० मीटरपर्यंत पोहोचली असून, ती इशारा पातळीच्या जवळ आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरले
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण मंगळवारी सकाळी १०० टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणातील पाणीपातळी १२०.३५ मीटर झाली असून, शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पूर्णतः निकाली निघाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
धरणांमध्ये पाणीसाठा वाढला
जिल्ह्यातील इतर धरणांमध्येही पाणीसाठा वाढत आहे. गडनदी धरणात ६१.४५ टक्के, अर्जुना धरणात ४४.८९ टक्के, मुचकुंदी धरणात ३१ टक्के, तर नातूवाडी धरणात २७.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महसूल, आपत्ती व्यवस्थापन व संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








