रत्नागिरी, दि. २० (अंकुश कदम): गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. त्यामुळे चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील पुरस्थिती हळूहळू ओसरत असून जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर गेल्या होत्या. रस्ते, बाजारपेठा, शाळा-कॉलेज पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. बुधवारी देखील जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.
राजापूरात पुर ओसरला, जीवन पूर्वपदावर
राजापूर शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता. अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून शहरात पाणी घुसले. जवाहर चौक, शिवस्मारक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज रोड, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ रस्ता, बाजारपेठ याठिकाणी पुराचे पाणी शिरले. अनेक टपऱ्या आणि दुकाने पाण्याखाली गेली. शहरातील राजापूर-शिळ-गोठणे-दोनिवडे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ग्रामीण भागातील शेतजमिनी व गावेही पुरामुळे प्रभावित झाली होती.
मात्र मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला आणि बुधवारी सकाळी पुराचे पाणी पूर्णपणे कमी झाले. जवाहर चौक व बाजारपेठेतील पाण्याने माघार घेतली आणि व्यापाऱ्यांनी पुन्हा आपल्या दुकानांची मांडामांड सुरू केली. नगर परिषदेने तात्काळ स्वच्छता मोहिम हाती घेऊन रस्त्यांवर साचलेला गाळ व कचरा हटविला. त्यामुळे शहरात स्वच्छतेची प्रक्रिया सुरू होताच सामान्य जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले.
चिपळूण व संगमेश्वरची परिस्थिती
चिपळूण शहरात शिव नदीच्या वाढत्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. बाजारपेठा आणि वसाहती भागांत पाण्याने अडथळा निर्माण केला होता. मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने पुरस्थितीत काहीशी सुधारणा दिसून आली. संगमेश्वर तालुक्यातही शास्त्री व सोनवी या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली होती, परंतु मंगळवारी संध्याकाळपासून सतत पडणाऱ्या पावसाला ब्रेक लागल्याने पाणी ओसरू लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.
प्रशासनाची दक्षता कायम
पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या गावे, व्यापारी व शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालये बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील पावसाची नोंद (दि. २० ऑगस्ट २०२५)
मंडणगड – १०१.७५ मिमी
खेड – १८२.१४ मिमी
दापोली – १३९.७१ मिमी
चिपळूण – १६६.६७ मिमी
गुहागर – १३०.४० मिमी
संगमेश्वर – १३८.९१ मिमी
रत्नागिरी – ११८.२२ मिमी
लांजा – ९७.८० मिमी
राजापूर – १११.६२ मिमी
आजचा एकूण पाऊस : ११८७.२२ मिमी
आजचा सरासरी पाऊस : १३१.९१ मिमी