रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. धनंजय कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधिक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणूनच ते पुढे कार्यरत राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये रत्नागिरीला नियुक्ती झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसह बारसू येथील रिफायनरीचा प्रश्नांसह जिल्ह्याचा सुरक्षा आणि सामाजिक सलोखा याकडे त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केल्याने अनेक गुन्ह्याची सहज उकल झाली आहे. बुधवारी (३ जुलै) संध्याकाळी श्री. कुलकर्णी यांच्या पदोन्नतीची बातमी रत्नागिरीत धडकली. त्या पाठोपाठ त्यांच्या बदलीचीही चर्चा सुरू झाली.
डाॅ. कुलकर्णी यांची वरिष्ठ श्रेणी पोलीस अधीक्षक म्हणून बढती झाली आहे. तसे आदेश निघाले आहेत; मात्र या पदोन्नतीनंतरही ते रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत हे आदेशात स्पष्ट झाले आहे. या पदोन्नतीबद्दल डाॅ.कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








