रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू – ५ फेब्रुवारीला मतदान, ७ रोजी निकाल

रत्नागिरी तालुक्यात २ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार

रत्नागिरी, दि. १६ (अंकुश कदम): ग्रामीण भागाच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील २ लाख ४ हजार ४९६ मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ४५ पुरुष मतदार आणि १ लाख ४ हजार ४४१ महिला मतदारांचा समावेश आहे.

आज (दि. १६) उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी निवडणूक कार्यक्रम, प्रशासकीय तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली.

१० जिल्हा परिषद गट, २० पंचायत समिती गण

रत्नागिरी तालुक्यात १० जिल्हा परिषद गट आणि २० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार असून, त्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यात एकूण २७१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यामध्ये
▪️ महिलांसाठी ‘सखी’ मतदान केंद्रे,
▪️ दिव्यांग मतदारांसाठी सुविधायुक्त मतदान केंद्रे,
▪️ तसेच काही ‘आदर्श’ मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगद्वारे सतत लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती जीवन देसाई यांनी दिली.

PDU (PADU) यंत्र रत्नागिरीला येणार नाही

निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या यंत्रांबाबत बोलताना जीवन देसाई यांनी स्पष्ट केले की, “PDU (PADU) यंत्र रत्नागिरी तालुक्यात आणले जाणार नाही. ईव्हीएम यंत्रणा पूर्णतः सुरक्षित असून, गरजेनुसार ११० टक्के ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आली आहेत.”

निवडणूक कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १६ जानेवारी रोजी अधिकृत निवडणूक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
▪️ नामनिर्देशन अर्ज दाखल : १६ ते २१ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३)
▪️ १८ जानेवारी : सार्वजनिक सुट्टी – अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
▪️ २२ जानेवारी : अर्जांची छाननी
▪️ २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
▪️ २७ जानेवारी : अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप
▪️ ५ फेब्रुवारी : मतदान (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
▪️ ७ फेब्रुवारी : मतमोजणी
▪️ १० फेब्रुवारीपर्यंत : नवनिर्वाचित सदस्यांची अधिकृत घोषणा

मतमोजणी कुवारबांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे.

७०७ अधिकारी-कर्मचारी तैनात; आचारसंहिता लागू

निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी ७०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये
▪️ ३४ क्षेत्रीय अधिकारी
▪️ २९८ मतदान केंद्राध्यक्ष
▪️ २८१ मतदान अधिकारी
यांचा समावेश आहे.

संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक खर्चावर मर्यादा घालण्यात आली आहे.
▪️ जिल्हा परिषद गट – कमाल खर्च मर्यादा ६ लाख रुपये
▪️ पंचायत समिती गण – कमाल खर्च मर्यादा ४.५० लाख रुपये

पहिल्याच दिवशी २८४ अर्जांची उचल; एकही दाखल नाही

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला आजपासून अधिकृत सुरुवात झाली.
पहिल्याच दिवशी २८४ इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज नेले, मात्र एकही अर्ज प्रत्यक्ष दाखल झाला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

निवडणुकीची अधिसूचना राजपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, गट विकास अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पंचायत समितीनिहाय स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयेही स्थापन करण्यात आली आहेत.

ग्रामीण राजकारणात चुरस वाढणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या ग्रामीण भागातील विकास, सत्तासमीकरण आणि स्थानिक नेतृत्व ठरवणाऱ्या असल्याने, येत्या काही दिवसांत राजकीय हालचाली, उमेदवारीसाठीची चढाओढ आणि प्रचाराचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ५ फेब्रुवारीच्या मतदानानंतर ७ फेब्रुवारीला ग्रामीण जनतेचा कौल स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा