रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कामकाजाचे अपर निबंधक संतोष पाटील यांच्याकडून कौतुक

नाटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेलाही भेट; शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र व नव्या कर्जाचे वितरण

रत्नागिरी, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट देऊन बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना रत्नागिरी जिल्हा बँकेचा राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये समावेश असल्याचे गौरवोद्गार काढले.

बँकेच्या कामकाजाचा आढावा घेताना कोकण विभागातील शेती कर्जवाटपातील अडचणी तसेच सहकारी बँकांना प्रगती करताना आवश्यक असलेल्या धोरणात्मक बदलांवर चर्चा झाली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या विविध मर्यादा व धोरणात्मक अडचणी मांडल्या. बँकेचे एक्स्पोजर लिमिट, कोकणातील सामाईक ७/१२ मुळे कर्ज वितरणावर होणारा परिणाम तसेच युवकांचे वाढते स्थलांतर या विषयांवर शासनस्तरावर धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा संतोष पाटील यांच्यासमोर सादर केला. यावेळी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, बँकेचे संचालक, अधिकारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर संतोष पाटील यांनी राजापूर तालुक्यातील शासनाचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्राप्त नाटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, बँकेचे संचालक अमजद बोरकर, सरव्यवस्थापक संदीप तांबेकर, सहाय्यक निबंधक पाटील, संस्थेचे अध्यक्ष विलास फणसेकर, व्यवस्थापन समिती सदस्य व सचिव उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांपैकी दोन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बेबाक प्रमाणपत्र व नवीन कर्जवाटपाचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेच्या नव्याने सुरू केलेल्या बचत योजनेतील पाच खातेदारांना पासबुकचे वितरण करण्यात आले. वृक्षारोपणाच्या संकल्पनेतून संस्थेच्या सभासदांना सुपारीच्या रोपांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. कर्ज व्यवहाराबरोबरच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेने पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी संस्थेच्या धान्य विभाग, एसटी आरक्षण, कीटकनाशके विभाग, शेती अवजारे, प्लास्टिक विभाग, ग्राहक भांडार आणि सीएससी सेंटरला भेट दिली.

नाटे संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करून संतोष पाटील यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा