रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक टप्पा : व्यवसाय ५ हजार कोटींवर, ९४ कोटी नफा

रत्नागिरी, दि. २४ (अंकुश कदम): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आर्थिक वाटचालीत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय पहिल्यांदाच ५ हजार कोटी रुपयांवर पोहोचला असून, ९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सर्वसाधारण सभेत दिली. या यशस्वी आर्थिक वर्षाच्या निमित्ताने, बँकेने आपले सभासदांना यंदाही १५ टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.
शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित सभेत बँकेच्या उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सभासदांच्या हितासाठी अनेक निर्णय
डॉ. चोरगे यांनी स
भासदांशी संवाद साधताना सांगितले की, बँकेशी संलग्न सहकारी पतसंस्थांसाठी कर्जाच्या व्याजदरात अर्धा टक्क्याची सूट देण्यात आली आहे, जेणेकरून कर्जपुरवठा व वसुली या दोन्ही बाबतीत सुधारणा होईल. सध्या बँकेच्या ७४ शाखा असून त्यातील २५ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. लवकरच सर्व शाखा स्वमालकीच्या इमारतींत हलवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मानवतेचा आधार : समाजोपयोगी उपक्रम
कोरोनाकाळात किंवा अपघातग्रस्त कर्जदारांच्या वारसदारांचे कर्ज माफ करून बँकेने आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. याशिवाय, १०० संगणक शाळांना संगणक भेट, अनाथाश्रम, दिव्यांग वसतीगृहे, शेतकरी कार्यशाळा, साहित्य संमेलने अशा विविध उपक्रमांसाठी ५५ लाख ८५ हजारांची आर्थिक मदत
 करण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळ व महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, उद्योजक व शैक्षणिक संस्थांना २५ लाखांपर्यंत केवळ ५% व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात आला आहे. ३ मोबाईल एटीएम व्हॅन्स रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये कार्यरत असून, डिजिटल बँकिंग सेवा ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवली जात आहे.
प्राथमिक शेती सहकारी संस्थांची मदत
प्राथमिक सहकारी संस्थांसाठी दरमहा कर्जपुरवठ्यावर आधारित आर्थिक प्रोत्साहन (१५०० ते ५००० रुपये) दिला जात असून, ५ लाखांपर्यंत संस्था इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच, सर्व ९ तालुक्यांमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र उभे करून समावेशीकरणाला चालना देण्यात आली आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा सन्मान
याच सभेत पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्ष डॉ. चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
ही सर्वसाधारण सभा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षमतेचा आणि सामाजिक बांधिलकीच्या वचनबद्धतेचा प्रचिती देणारी ठरली. बँकेचा वेगाने वाढणारा व्यवसाय आणि विविध समाजोपयोगी उपक्रम भविष्यात या संस्थेला आणखी मजबूत स्थान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा