कोकणातील बेरोजगारीवर धार्मिक पर्यटनाचा उपाय; प्रत्येक गावात पाच कडवट कार्यकर्ते तयार करा – रवींद्र चव्हाण

भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी बैठक व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. १७ : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी उत्तर व दक्षिण जिल्ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्ता मेळावा बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात जिल्हाभरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार तथा प्रभारी योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रमोद जठार, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार डॉ. विनय नातू, सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादवसतीश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपची विचारधारा गावागावांत आणि घराघरांत पोहोचविण्याचे आवाहन केले. “भाजपची ताकद तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे वाढली आहे. प्रत्येक गावात किमान पाच कट्टर भाजप कार्यकर्ते तयार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत,” असे त्यांनी सांगितले.

कोकणातील बेरोजगारीच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी धार्मिक पर्यटन विकासाला चालना देण्याची गरज व्यक्त केली. मार्लेश्वर, गणपतीपुळे, संगमेश्वर सूर्यमंदिर, छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि धूतपापेश्वर मंदिर यांसारख्या स्थळांचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे ते म्हणाले. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पर्यटन विकासाचे आराखडे तयार करून पक्ष नेतृत्वाकडे सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “संधी साधून महाविकास आघाडीत गेलेल्या नेत्यांना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.” त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांच्यासह चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांतील अनेक माजी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मेळाव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे चित्र दिसून आले.

आणखी वाचा