मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने झालेली निवड ही सभागृहाच्या लोकशाही परंपरा आणि संसदीय मूल्यांचा विजय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधान परिषदेत सचिन अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना त्यांनी हा गौरव व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा सन्मान राखत एकमताने उपसभापतीची निवड केली. त्यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून, सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. सचिन अहिर यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा, संतुलित दृष्टिकोनाचा आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिन अहिर यांनी विधानसभा सदस्य, राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका, अभ्यासू वृत्ती आणि सर्वांशी सुसंवाद राखण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उपसभापतीपद हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, या पदावरील व्यक्तीने सर्व सदस्यांना समान न्याय देणे अपेक्षित असते. अहिर हे आपल्या संयमी आणि निष्पक्ष कार्यशैलीमुळे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही गौरव केला. महिलांवरील अत्याचार, दलित, पीडित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली संवेदनशील भूमिका उपसभापतीपदाची प्रतिष्ठा वाढविणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
१९९३ मध्ये कामगार चळवळीतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणारे सचिन अहिर हे १९९९ ते २०१४ या काळात सलग तीन वेळा आमदार राहिले असून, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, पर्यावरण, खनिकर्म आणि आदिवासी विकास या विभागांचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्यासह सदस्यांनीही सचिन अहिर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.








