रत्नागिरी, दि. ०२ (प्रतिनिधी): संगीत रंगभूमीवर नवनवीन संगीत नाटकांची निर्मिती करून, संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सातत्यपूर्ण आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या खल्वायन या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित संगीत अमृतवेल या नव्या कोऱ्या नाटकाचे सर्वांगाने उत्कृष्ट सादरीकरण करीत ८ वैयक्तिक पारितोषिकांसहीत सांघिक तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या नाटकासाठी अभिनय रौप्य पदक अनिकेत आपटे, गायन रौप्यपदक सावनी शेवडे, तबलासाथ प्रथम हेरंब जोगळेकर, नेपथ्य प्रथम प्रदीप तेंडुलकर, नाट्यलेखन द्वितीय डॉ. श्रीकृष्ण जोशी, संगीत दिग्दर्शन द्वितीय राम तांबे, ऑर्गनसाथ द्वितीय स्वानंद नेने, गायन गुणवत्ता प्रमाणपत्र अनामय बापट यांनी यश मिळवले.
एकाच लेखकाची ७ नवीन नाटके मोठ्या धाडसाने व कल्पकतेने रंगभूमीवर आणून, त्याची यशस्वी निर्मिती करून, संगीत रंगभूमीवर नवनवीन कलाकार उदयाला आणून, संगीत रंगभूमीवर एक आगळेवेगळे स्थान खल्वायनने निर्माण केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नवीन संगीत नाटकांची निर्मिती करण्याची मुहूर्तमेढसुध्दा खल्वायन संस्थेने १९९८ सालापासून केली आहे.
संगीत नाटक ही जागतिक रंगभूमीला मिळालेली देणगी आहे असे म्हटले जाते. जुन्या त्याच त्याच नाटकांचे रंगभूमीवर तेच तेच प्रयोग अनेक वर्ष अनेक संस्था करीत आहेत. पूर्वीच्या दिग्गज कलाकारांनी संगीत नाटकातील अनेक भूमिका अजरामर करून ठेवल्या आहेत. त्या भूमिका तशाच प्रकारे वठवण्याचा प्रयत्न अनेक जुने- नवे कलाकार करीत असतात. परंतु त्याच त्याच भूमिका तेच तेच कलाकार, तीच तीच गाणी यामुळे प्रेक्षकांना ते रूचेनासे झाले आणि त्यामुळे संगीत रंगभूमीवरील प्रेक्षक संख्या कमी होत जाऊन संगीत रंगभूमीला मरगळ आली, संगीत रंगभूमी अस्ताला गेली असताना संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था येण्यासाठी नवीन नाटक सादर करायचे आव्हान स्वीकारून १९९८ साली संस्थेने रत्नागिरीतील प्रसिध्द नाट्यलेखक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या संगीत स्वरयात्री नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कार्याची मुहूर्तमेढ केली. यापूर्वी रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरात जुन्या संगीत नाटकाचे प्रयोग उत्सवाचे निमित्ताने अथवा एखाद दुसरी संस्था राज्य नाट्य स्पर्धेनिमित्ताने होत होते. परंतु नवीन नाटक बसवायचे धाडस कोणी करीत नव्हते. परंतु नवीन नाटकासाठी आवश्यक असे नेपथ्य, दिग्दर्शनातील बारकावे, संगीत काराकडून गाण्याच्या चाली तयार करून घेणे, न कंटाळता तालमा घेणे, उपलब्ध कलाकारातून भूमिकेला साजेल, अशी पात्र निवड करणे अशा अनेक गोष्टी मधून संस्थेने आपली संगीत रंगभूमीवरील कारकीर्द उदयाला आणली. राज्य नाट्य स्पर्धेबरोबर नवी दिल्ली येथील नाट्य स्पर्धेतही संस्थेने ८ वर्षे सहभाग घेऊन तेथेही घवघवीत यश संपादन केले आहे.
डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित स्वरयात्री, घन अमृताचा, शांतिब्रह्म, राधामानस, ऐश्वर्यवती, ऋणानुबंध व अमृतवेल अशा 7 नवीन कोऱ्या नाटकाची निर्मिती व डॉ. विद्याधर ओक लिखीत ताजमहाल ह्या आणखी एका नव्या कोऱ्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत या ८ पैकी 3 नाटकांना प्रथम क्रमांक , एका नाटकाला व्दितीय क्रमांक व एका नाटकाला तृतीय क्रमांक तसेच नवी दिल्ली येथील स्पर्धेत सुद्धा यापैकी एका नाटकाला प्रथम क्रमांक व एका नाटकाला तृतीय क्रमांक मिळाले आहेत. या नाटकांचे मुंबई, दिल्ली, गोवा, मध्यप्रदेश, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणच्या नाट्य महोत्सवात प्रयोग झाले आहेत.
संस्थेने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी होणारी मासिक संगीत सभा (३००), गुढी पाडवा व दिवाळी पाडवा (५० सभा) या दिवशी होणाऱ्या विशेष संगीत सभा यामध्ये गेली २७ वर्ष सातत्य राखले आहे. पण संगीत रंगभूमीवर सुध्दा जुन्यापेक्षा नवीन नाटकाची निर्मिती करण्यामध्येही सातत्य राखले आहे. नव्या नाटकांबरोबरच जुन्या संगीत सौभद्र, संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत प्रीतिसंगम, संगीत संशयकल्लोळ, संगीत ययाति आणि देवयानी, संगीत मत्स्यगंधा या नाटकांची सुध्दा तेवढ्याच ताकदीने निर्मिति करून घवघवीत यश संपादन केले आहे. अशा प्रकारे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा , साथ संगत, पार्श्व संगीत, अभिनय इ. नाटकातील सर्व अंगांचा कल्पक बुद्धिमत्तेने योग्य प्रकारे विचार करून यशस्वी सादरीकरण करणारी खल्वायन ही रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेकाव्दितीय संस्था आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.








