संगमेश्वर–पाटण घाटमार्गाला गती

सचिव (रस्ते) यांच्याकडे सादरीकरणास मंजुरी; अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर–म्हैसकर यांचे निर्देश

संगमेश्वर, दि. 10 (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील मुंबई–गोवा महामार्गापासून सुरू होणाऱ्या संगमेश्वर–पाटण घाटमार्ग कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या घाटमार्गाच्या कामाचे पॉवर पॉईंट सादरीकरण (PPT) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव (रस्ते) यांच्याकडे करण्यास मंजुरी देण्याबाबत अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनिषा पाटणकर–म्हैसकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिल्या आहेत.

घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर–म्हैसकर यांची भेट घेऊन घाटमार्गाच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी तसेच सचिव कार्यालयाकडून सादरीकरणासाठी आवश्यक परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या विनंतीची तातडीने दखल घेत अपर मुख्य सचिवांनी सचिव (रस्ते) यांना सादरीकरण घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तब्बल ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या घाटमार्ग प्रकल्पाला प्रशासन स्तरावर गती मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर–म्हैसकर यांच्या संवेदनशील व सकारात्मक भूमिकेमुळे या प्रकल्पासंबंधी हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव कार्यालयाकडून रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी यांना पत्र पाठवून संगमेश्वर–पाटण घाटमार्गाचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

शासनाच्या आदेशानुसार या घाटमार्ग कामाचे सादरीकरण अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी यांच्या स्तरावर पूर्ण झाले असून, मोनार्च सर्व्हेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लि. या कंपनीने पहिल्या टप्प्यात आपले सादरीकरण केले आहे. पुढील टप्प्यात सचिव (रस्ते) यांच्याकडे सादरीकरणासाठी परवानगी आवश्यक असल्याने समन्वयक संतोष येडगे यांनी अपर मुख्य सचिवांची भेट घेऊन विनंती केली होती. त्यानंतर तातडीने सकारात्मक निर्देश देण्यात आले.

संगमेश्वर ते पाटण (चाफेर) या एकूण ४६.६०० किमी लांबीच्या घाटमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मोनार्च कंपनीकडे देण्यात आले असून, डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) शासनाकडे सादर करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. विहित कालावधीत डीपीआर सादर करून प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण करत चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या मार्गापैकी २६.६०० किमी एकेरी रस्ता आधीच तयार असून, उर्वरित २० किमी रस्ता पूर्ण करणे बाकी आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५.५०० किमी आणि सातारा जिल्ह्यातील १४.६०० किमी रस्त्याचा समावेश आहे. सुमारे २०.१०० किमी एकेरी रस्ता पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू होऊ शकते.

संगमेश्वरपासून सुरू होणारा हा घाटमार्ग हातखंबा, बावनदी, आंबेड, कोसुंब, करंबेळे, वाशी, धामणी, तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, पाचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे, नांदगाव, येगाव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे आदी सह्याद्री पट्ट्यातील व खाडी परिसरातील असंख्य गावांना जोडणार आहे.

हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे व सातारा येथे जाण्यासाठीचा प्रवास लक्षणीयरीत्या कमी होणार असून, वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे चार लाखांहून अधिक नागरिक या घाटमार्गासाठी आग्रही असून, हा प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आणखी वाचा