कोल्हापूर, दि. २९ (प्रतिनिधी) : भारतातील सुवर्णालंकार क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने आपल्या ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ या समकालीन आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध युवा आयकॉन सारा तेंडुलकरची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे तरुण पिढीशी अधिक घट्ट नातं निर्माण करण्याचा पीएनजीचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होत आहे.
जवळपास दोनशे वर्षांची परंपरा जपत पीएनजी ज्वेलर्सने बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवत ‘लाइटस्टाईल’ हा स्वतंत्र ब्रँड विकसित केला आहे. दैनंदिन वापरासाठी उपयुक्त, आधुनिक आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांवर या ब्रँडचा भर आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले की, ‘लाइटस्टाईल’ हा केवळ ट्रेंड नाही, तर पीएनजी अंतर्गत जाणीवपूर्वक उभारलेला स्वतंत्र ब्रँड आहे. आजची तरुण पिढी वेगळ्या पद्धतीने दागिन्यांकडे पाहते. त्यांच्या अभिव्यक्तीला साजेसे, रोजच्या वापरात येतील असे समकालीन डिझाइन्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे आणि गोव्यात मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा ब्रँड आता राष्ट्रीय स्तरावर नेण्याची आमची तयारी आहे.
सारा तेंडुलकरची निवड तिच्या साध्या, पण आधुनिक जीवनशैलीमुळे करण्यात आल्याचे पीएनजीकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर कोट्यवधी चाहत्यांची पसंती असलेली सारा पुढील काळात ‘लाइटस्टाईल’च्या जाहिरात मोहिमा, डिजिटल उपक्रम आणि स्टोअर लॉन्चिंगमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहे.
या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना सारा तेंडुलकर म्हणाली, ‘लाइटस्टाईलची ज्वेलरी नैसर्गिक सहजतेचे प्रतिबिंब आहे, जे माझ्या वैयक्तिक स्टाईलशी पूर्णपणे जुळते.’
दरम्यान, पीएनजी ज्वेलर्सने आपल्या विस्तार योजनाही जाहीर केल्या असून आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत एकूण ५० नवी स्टोअर्स सुरू करण्याचा मानस आहे. सारा तेंडुलकरच्या सहभागातून साकारलेले विशेष कलेक्शन मार्च २०२६ पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असून, यामुळे दागिन्यांच्या बाजारात नव्या ट्रेंडची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








