“इसिस” या अतिरेकी संघटनेजवळ कनेक्शन ? कोकण हादरले / सावर्डेत ए.टी.एस.ची मोठी कारवाई

सावर्डे (चिपळूण), दि. १० (प्रतिनिधी): कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे नवी मुंबईच्या एटीएस (दहशतवाद विरोधी) पथकाने मोठी कारवाई केली आहे. नवरात्रउत्सवात ही कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इसिस या अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याच्या मोठ्या खळबळजनक आरोपाखाली सावर्डेतून एकूण सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून दहशतवाद विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. एटीएसने एकूण सहा जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये कर्नाटकातील पाच जणांचा समावेश आहे. बंदी असलेल्या खैर लाकडाच्या तोडीतून मिळणाऱ्या पैशातून अतिरेकी देशविघातक कारवायासाठी त्याचा वापर केला जात असल्याचा संशयावरून ही मोठी कारवाई एटीएसच्या पथकाने केली आहे. संबंधित अटकेत असलेल्या एका आरोपीजवळ यातील वसीम या संशयित आरोपीचा संपर्क असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. येथील एकूण सहा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्य पोलीस अधीक्षक प्रवीण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटच्या प्रतिभा शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैशाली गायकवाड व चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

असा आहे “इसिस” कनेक्शन-

अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींपैकी वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन हा “इसिस” संबंधातील रतलाम, मध्यप्रदेश येथील “अल् सुफा मॉडयुल” मधील जुलै-2023 मध्ये अटकेत असलेला आरोपी आकिफ नाचण, रा. बोरीवली, पडघा, जि. ठाणे याचेशी जवळीक असलेला आहे. यांतील संशयीत इसम वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन हा बेकायदेशीरपणे तो वाहनातून त्या लाकडाची चोरून वाहतूक करतो आणि त्या लाकडांची खरेदी विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवून त्यातील काही रक्कम तो देशविघातक कृत्ये विरोधात काम करणारे काही धार्मिक कट्टरवादी इसम व संशयीत संघटनांना देत आहे.” असा मोठा संशय या आरोपीवर आहे. यावरून ही दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे.

खैर तोडीचे कर्नाटक कनेक्शन-

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1) वसीम अख्तर मुक्तार अहमद मोमीन, रा.78, इस्लामपूरा मशीदजवळ भिवंडी महानगर पालिकेच्या पाठीमागे, ता. भिवंडी, जि. ठाणे 2) असिफ रशिद शेख, रा. नगरसुल, ता. जि. नाशिक 3) फारुख शेरखान पठाण, रा. रेव्हेन्यु कॉलनी, येवला रोड, नाशिक 4) शाहनवाज प्यारेजन, रा.एन.एन.टी. रोड, चिंतामणी टाउन, चिकबल्लापूर, कर्नाटक 5) इरशाद शेख, रा. संगमनेर, अहमदनगर, 6) मुआज रियाज पाटणकर, रा. 1842, अडरेकर मोहल्ला, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी आपसात संगनमत रचून व फौजदारी पात्र कट करुन कर्नाटक राज्यातून बेकायदेशीरपणे चोरुन आणलेले “खैर झाडाचे” लाकडाचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठा मुआज रियाज पाटणकर याने सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे खाजगी मालकीची गट नं. 3476, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत लपविलेला असल्याची मोठी गोपनिय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. संशयीतांकडे केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने पुढील ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

सुमारे दहा लाख रुपयांचा खैर साठा लपवला-

ढिगा-यातील लाकडाची पाहणी करुन सदरची सर्व लाकडे ही कोणत्या झाडाची आहेत, याबाबत विचारणा केली. त्याप्रमाणे वरील नमुद वन अधिकारी यांनी नमुद ढिगा-यावरील प्लॅस्टीक कागद बाजूला करुन त्यातील सर्व लाकडांची तपासणी करुन लाकूड मालाची खात्री केली. सदर लाकूड माल “खैर” जातीचा (अंकोशिया कॅटेच्यु) असून तो असोली आहे. सदर लाकूड मालावर कोणत्याही प्रकाराच्या निर्गत निशाणी दिसून येत नाहीत. यावरुन सदर लाकूड विनापासी वाहतुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रकमध्ये भरलेला “खैर” जातीचे लाकूड आहे त्याचे वजन 38 हजार 210 किग्रॅ असून रिकाम्या ट्रकचे वजन 14210 किग्रॅ आहे, यावरुन ट्रकमध्ये एकूण 24000 किग्रॅ (24 टन) “खैर लाकूड” भरलेले होते. खैर असोली लाकूड मालाचे आजचे बाजारभाव मालाप्रमाणे प्रति टन दर रुपये 42 हजार रुपये असून सदर ठिकाणी उतरवून ठेवलेल्या खैर लाकूड मालाची किंमत अंदाजे रुपये 10 लाख 8 हजार इतकी आहे.

या सगळ्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 प्रमाणे 303(1),317,112,3 (5), 61, तसेच भारतीय वन अधिनियम 1927 26(1) (ई) (एफ),41(1) (2) (बी) डी) (ई),42,52,55, 61 (ए), 65 (डी),69,77 या कलमान्वये हे गुन्हे अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींवर दाखल करण्यात आले आहेत

दरम्यान या सगळ्या संशयित आरोपींचा तपास सुरू असून आणखी काय कनेक्शन आहे या सगळ्याची तपास दहशतवाद विरोधी पथक घेत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी कोणती मोठी माहिती समोर येथे हे पहावे लागणार आहे. खैरतोडीचा आर्थिक व्यवहार व्यवहार कशाप्रकारे चालतो या सगळ्यातून आर्थिक व्यवहाराचा उपयोग दहशतवादी कनेक्शन वापरून देश विघातक कृत्यासाठी कशाप्रकारे केला जात होता या सगळ्याचा तपास रत्नागिरी पोलीस व नवी मुंबई येथील दहशतवाद विरोधी पोलीस पथक करीत आहे.

आणखी वाचा