
सावर्डे, दि. ४ (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्यात पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ हे देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून नावारूपाला येईल,” असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. काकोडकर म्हणाले, विद्यापीठ हे समाजाचे प्रतिबिंब असले पाहिजे. ग्रामीण भागात उभे राहत असलेल्या या विद्यापीठाने सुरुवातीपासूनच उच्च दर्जाच्या संशोधनाचा पाया घातला आहे, ही मोठी जमेची बाजू आहे. डेरवण-सावर्डे परिसरात श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टने आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे हा परिसर एक आदर्श ज्ञानकेंद्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी कोणत्याही आव्हानावर मात करण्याची क्षमता असलेला असावा. विद्यापीठांनी आपल्या ऊर्जेचा मोठा भाग संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी खर्च करावा, परीक्षा व्यवस्थापन स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या विद्यापीठातील संशोधन प्रयोगशाळा उत्कृष्ट दर्जाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी डेक्कन महाविद्यालयाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी मंत्री शशिकांत सुतार, कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. यशवंत गुप्ता, डॉ. अरविंद नातू, कुलपती विकास वालावलकर, प्रमुख विश्वस्त अशोक जोशी आणि रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कुलपती विकास वालावलकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.








