नवी दिल्ली, दि. 24 : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे पार पडले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
पद्म पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता.
अलका याज्ञिक यांना पद्मभूषण
प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 16 हून अधिक भाषांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीतविश्वात अमूल्य योगदान दिले आहे.
सहा मान्यवरांना पद्मश्री
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मांनी भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
नवजात शिशुवैद्यकशास्त्रातील अग्रगण्य तज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला. त्यांनी 1989 मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू करून नवजात बालकांच्या आरोग्यसेवेत मोलाची भर घातली.
वारली आदिवासी संस्कृतीचे जतन करणारे 89 वर्षीय भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तारपा वाद्य वादनाची त्यांची परंपरा राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आली.
अभिनेते, पटकथालेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आर. माधवन यांनाही कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘थ्री इडियट्स’, ‘तनू वेड्स मनू’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने विशेष छाप पाडली आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी चार दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दास ऑफशोअर’ या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनीचे ते संस्थापक आहेत.
यंदा 131 पद्म पुरस्कारांची घोषणा
यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.








