
चिपळूण, दि. १८ (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चिपळूणच्या दौऱ्यावर येत असून रविवार दिनांक २२ आणि सोमवार दिनांक २३ रोजी असे दोन दिवस ते येथे तळ ठोकणार आहेत. यावेळी काही प्रकल्पांना ते भेटी देणार असून काही महत्वाच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत. यामध्ये सोमवार दिनांक २३ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण बहादूरशेख येथील सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला संगमेश्वर-चिपळूणसह जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच मित्र पक्षांचे नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा रत्नागिरी जिल्हा पक्ष निरीक्षक बबनराव कनावजे चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, कुमार शेट्ये, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी बबन कनावजे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची तयारी सुरू झाली असून प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरू झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे प्राप्त झालेले आहेत. मात्र, चिपळूण संगमेश्वर- मतदारसंघातुन एकमेव प्रशांत यादव यांचा अर्ज पक्षाकडे आलेला आहे. महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार असल्याने आमची हक्काची जागा म्हणून आम्ही सर्वाधिक लक्ष चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाकडे दिलेले आहे. आमच्या पक्षाकडून प्रशांत यादव यांचे नाव निश्चित असले तरी शेवटी महाविकास आघाडीचा निर्णय अंतिम असेल. आघाडीकडून निर्णय झाल्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाईल असेही ते म्हणाले.
पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी काही महत्वाच्या मतदारसंघाकडे अधिक लक्ष घातले असून त्याअनुषंगाने शरद पवार साहेब रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी चिपळूणमध्ये येणार आहेत. यादिवशी त्यांचा चिपळूणमध्ये मुक्काम राहणार आहे. तसेच वाशिष्ठी दूध प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आशा ठिकाणी ते भेटी देणार आहेत. तसेच माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी देखील शरद पवार भेट देणार असून काही प्रमुख पदाधिकारी, जुने मित्र, जेष्ठ पदाधिकारी व नेत्यांच्या भेटीगाठी देखील ते घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत, अशी माहितीही बबन कनावजे यांनी यावेळी दिली.
सोमवारी जाहीर सभा-
सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता चिपळूण शहरातील बहादूरशेख नाक्यावरील सावरकर मैदानात खा. शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघसह जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी स्पष्ट माहितीही कनावजे यांनी यावेळी दिली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, माजी उपनगराध्यक्ष सुचय रेडीज, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुरेश चिपळूणकर, सेवादल जिल्हाध्यक्ष अनवर जबले, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, सौ. सावित्री होमकळस, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. राधा शिंदे, शहराध्यक्ष सौ. डॉ. रेहमत जबले, कार्याध्यक्षा सौ. अंजली कदम, सौ. रुही खेडेकर, श्रीनाथ खेडेकर, ओबीसी सेल चिपळूण तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, दिनेश शिंदे, शमून घारे, हिंदुराव पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्यासाठी मैदानात
गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात उद्योजक प्रशांत यादव यांनी प्रवेश करताच अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीचे संकेत देण्यात आले. यानंतर प्रशांत यादव यांनी अल्पावधीतच चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ ढवळून काढला असून आ. शेखर निकम यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यामध्ये या मतदारसंघात मतदारांच्या थेट गाठीभेटी घेत गावभेट दौऱ्याद्वारे जनसंपर्कावर भर दिला. तसेच शेतकरी मेळावे आयोजित करून रोजगार निर्मितीच्या प्रश्नाला हात घातला. याचबरोबर गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करून चाकरमान्यांचे लक्ष वेधले. एकंदरीत मतदारसंघावर अल्पावधीतच पकड मिळवण्याचा जोरदारपणे प्रयत्न केला आहे. आता दस्तुरखुद्द शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.








