रत्नागिरी, दि. ०५ (प्रतिनिधी): रत्नागिरीतील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून आपल्या कार्यकर्त्यांसह आज (५ ऑक्टोबर) पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
याबाबत बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत त्यानी आणली. ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.
राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आणि तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार, असा विश्वास आबा घोसाळे यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केला.
पक्ष पक्षप्रवेशाच्या वेळी जयसिंग (आबा) घोसाळे म्हणाले की, आता आम्ही पालकमंत्री उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. रत्नागिरी तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचे यांनी जाहीर केले आहे.
जयसिंग (आबा) घोसाळे यांच्या समवेत त्यांचे भाऊ अनिल घोसाळे, अमोल घोसाळे, विक्रांत घोसाळे, अमित घोसाळे, अक्षय भाटकर, अतुल घोसाळे, गजेंद्र नाईक, उदय नागवेकर, विश्वजित चौगुले, सचिन वायंगणकर, महेश डोंगरे, बाळकृष्ण घोसाळे, संदेश भाटकर, आकाश भाटकर, मंथन भाटकर, आरोही घोसाळे, मंदार घोसाळे, यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी तालुका प्रमुख बाबू म्हाप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बंटी किर आदी पदाधिकारी उपस्थित होते.