रत्नागिरी, दि. १५ : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने पहिल्या टप्प्यात शक्तीप्रदर्शन करत एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या संयुक्त उमेदवारांनी शनिवारी नगरपरिषद कार्यालयात मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. येत्या १६ किंवा १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील महायुतीची उमेदवारांची यादी जाहीर होणार असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार १७ नोव्हेंबरला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
अर्ज दाखलच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम दावा केला. “या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल. आमचा नगराध्यक्ष १५ हजार मतांच्या विक्राळ फरकाने निवडून येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. यामध्ये आमदार निरंजन डावखरे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, अतुल काळसेकर, यशवंत जाधव, ॲड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, अनिकेत पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पहिल्या टप्प्यात दाखल १५ उमेदवारी अर्जांपैकी शिवसेनेचे ९ आणि भाजपचे ६ उमेदवार आहेत. शिवसेना (शिंदे गट) आधीच आपली पहिली यादी जाहीर करून आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किरण सामंत, यशवंत जाधव, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, विलास चाळके आणि बंड्या साळवी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
घोषित उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे –
प्रभाग २ : निमेश नायर
प्रभाग ३ : राजन शेट्ये
प्रभाग ५ : सौरभ मलुष्टे
प्रभाग ७ : गणेश भारती, श्रद्धा हळदणकर
प्रभाग ८ : बाळू साळवी
प्रभाग ९ : विजय खेडेकर
प्रभाग १३ : सुहेल साखरकर, आफरीन होडेकर
शिवसेनेची यादी जाहीर होताच महायुतीच्या पुढील रणनीतीलाही गती मिळाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत उमेदवारांमध्ये चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीतर्फे भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला पालकमंत्री सामंत प्रमुखपणे उपस्थित राहिले.
रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक रंगात आली असून महायुती आणि विरोधक या दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. या घोषणांमुळे निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे.








