ठाकरेंचे अहिर फुटले… सचिन अहिर शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून उपसभापतीपदाच्या रिंगणात

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता सचिन अहिर यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बुधवारी (१ जुलै) होणाऱ्या विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महायुतीने सचिन अहिर यांना अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे.

अर्ज दाखल झाल्यानंतर बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घडामोडीवर भाष्य केले. “सचिन अहिर हे धनुष्यबाण चिन्हावर विधान परिषदेत निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान करून निवडून दिले आहे. त्यामुळे ते शिवसेनेचेच आमदार आहेत. आम्ही कोणाला तुडवायला नाही, तर शिवसेना वाढवण्यासाठी आलो आहोत,” असे शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी अहिर यांच्या राजकीय अनुभवाचे कौतुक करत, “सचिन अहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून विविध विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. गिरणी कामगार, कोळी बांधव आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा विधान परिषदेला आणि महाराष्ट्राला होईल,” असे सांगितले.

यावेळी शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकाही केली. “आठवडाभरापूर्वी सहा खासदार आमच्यासोबत आले. आता सचिन अहिर यांनीही महायुतीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढेही असे चौकार आणि षटकार सुरूच राहतील,” असा सूचक इशारा त्यांनी दिला.

दुसरीकडे ठाकरे गटाने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी हा निर्णय संविधानातील दहाव्या अनुसूचीच्या विरोधात असल्याचा दावा केला. “एकटा आमदार दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी कशी स्वीकारू शकतो? त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी. ही बंडखोरी नसून राजकीय सौदेबाजी आहे,” अशी टीका त्यांनी केली.

ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी पक्षाची अधिकृत भूमिका आदित्य ठाकरे मांडतील, असे सांगितले. तर आमदार सुनील राऊत यांनी, “शिवसेनेने यापूर्वीही अनेक धक्के पचवले आहेत. सचिन अहिर हे काही मास लीडर नव्हते,” अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, विधान परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सचिन अहिर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. सहा खासदारांनंतर आता विधान परिषदेतील एका आमदारानेही शिंदे गटाची साथ दिल्याने ठाकरे गटासमोरील राजकीय आव्हाने आणखी वाढल्याचे चित्र आहे. या घडामोडीमुळे राज्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी काळात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा