नारायण राणे यांना जशाच तसे उत्तर देणार….आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार : खा. विनायक राऊत

चिपळूण, दि. ०५ (प्रतिनिधी): मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. त्यांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. जेष्ठांचा आदर, देव देवतांप्रति श्रद्धा, भजन कीर्तन ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. आणि माझ्या संस्कृतीचा व परंपरेचा मला अभिमान आहे. त्यामुळे नारायण राणे तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुमचा पंचनामा करण्यास सुरुवात केली ना तर अवघड होईल.आशा खणखणीत शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चिपळूण येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा जाहीर मेळावा चिपळूण येथील माटे सभागृहात शुक्रवारी सकाळी पार पडला. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सुभाष बने, संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, जेष्ठ समाजवादी नेत्या उल्काताई महाजन, जिल्हाप्रमुख सचिन कदम, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख मुराद अडरेकर, यांच्यासह आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राडा विकृती येऊ पाहतेय-
उमेदवार विनायक राऊत यांनी सुरुवाती पासूनच थेट नारायण राणे यांना टार्गेट केले.ते म्हणाले दुर्दैवाने राडा विकृती आपल्या समोर येऊ पाहत आहे. २०१४ साली ज्यावेळी मी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी कोकणात हीच राडा विकृती हैदोस घालत होती .परंतु कोकणी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यांच्या दाहशतीला व दादागिरीला आळा घालण्यात आपण यशस्वी ठरलो.दोन वेळा त्यांना अद्दल घडवली. तरी देखील त्यांना आता खुमखुमी आलेली आहे. पण एक लक्षात ठेवा हे फक्त कमळ निशाणीवर भाजप चे उमेदवार नाहीत तर ही राडा विकृती आहे.त्यामुळे सावधान राहा,सजग राहा असेही ते म्हणाले.
संसदेत मोठे प्रताप –
     हे महाशय केंद्रीय मंत्री चांगले उद्योग खाते त्यांच्याकडे दिलेले. पण हे कणकवलीतळे “याड” याला काय त्या खात्यातील माहिती असणार.? एका महिला खासदाराने त्यांच्या खात्यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा हे महाशय उत्तर द्यायला उठले, पण प्रश्न तामिळनाडूचा आणि हे उत्तर देतात केरळा चे, शेवटी अध्यक्षांनी त्यांना रोखले,  असा हा याड, आणि असे त्यांचे प्रताप, संसदेत हे महाशय औकात हा शब्दत वापरतात, काय म्हणावं याला, पार अब्रू घालवली या माणसाने,आशा शब्दात विनायक राऊत यांनी पार पानउताराच केला.
वा, मोदी साहेब…वा
    विनायक राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टीकेचे लक्ष्य केले.ते म्हणाले मोदी साहेबांचे कर्तृत्व काय माहित आहे.?अहो या देशातील अनेक उद्योजक देश सोडून गेलेत,त्यापैकी सर्वाधिक गुजरात मधील उद्योजक आहेत.केंद्र सरकार ज्या पद्धतीने त्यांचा छळ करत होते त्याला कंटाळून हे उद्योजक देश सोडून गेलेत.आणि आता मोदी आणि अमित शहांचा डोळा मुंबईवर आहे.त्यांना मुंबई गुजरातमध्ये हवी आहे.त्यासाठी शिवसेना संपवायची आहे,राष्ट्रवादी खतम करायची आहे.पण जो पर्यंत उद्धव ठाकरे सारखा योद्धा मुंबईत आहे तो पर्यंत कोणाची माय व्याली नाही मुंबई तोडायची..! असा थेट इशाराच त्यांनी दिला.
पळवापळवी-फसवाफसवी-
विनायक राऊत म्हणाले अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले. महत्वाची कार्यालये गुजरातला नेत आहेत.सर्व पळवापळवी सुरू आहे.अन्न सुरक्षा कायदा हा नरेंद्र मोदी नी आणलेला नाही.तर कायद्याचे योजनेत रूपांतर करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. ही फसवणूक आहे. देशातील जनतेची व शेतकऱ्यांची चक्क फसवणूक केली जात आहे. देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन गुजराती आहेत. त्यांना रोखायचे असेल तर यावेळी इंडिआ आघाडीची सत्ता आणावीच लागेल, त्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
सिडकोचे भूत कोकणात-
    कोकणात सिडको प्राधिकरण आणले जात आहे. ४ मार्च रोजी तसा जीआर राज्य सरकारने काढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १६३५ गावे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. सिडकोमुळे गावातील ग्रामपंचायतीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. तेथील ग्रामस्थांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. कोकण भु माफियांच्या घशात घालण्याचा हा भयानक डाव आहे. परंतु येथील मंत्री त्याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. मात्र तुम्ही निवडून दिलेला विनायक राऊत गप्प बसला नाही.सर्वात पहिला विरोध मी केला आहे. आणि करत राहणार, कोकणात सिडको चे भूत आणू देणार नाही. असा थेट इशाराच त्यांनी दिला.
यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, सुभाष बने, प्रशांत यादव, उल्काताई महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करत विनायक राऊत यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन उपस्थितांना केले. मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच महाविकास आघाडीची भक्कम एकजूट देखील यावेळी दिसून येत होती.
आम. जाधव पूर्व विदर्भात-
    आम. भास्कर जाधव मेळाव्याला उपस्थित नव्हते त्याबाबत विनायक राऊत यांनी सुरुवातीलाच खुलासा केला. ते म्हणाले भास्करराव जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी असल्याने ते येथे येऊ शकलेले नाहीत. पुढील प्रचारात दे सहभागी असतील. त्यामुळे राणेंच्या टिळल्या-पिळल्यानी उगीच फुरफुर करू नये. आणि भास्कर जाधव यांच्यावर बोलण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. असा सूचक इशाराच विनायक राऊत यांनी दिला.

आणखी वाचा