गुहागर, दि. १० : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गट विभाग प्रमुखपदी कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते अतुल अनंत लांजेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी ही नियुक्ती केली.
अतुल लांजेकर हे साध्या व नम्र स्वभावाचे तसेच जनतेमध्ये मिसळून काम करणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गुहागर तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून सर्व समाजघटकांशी सहज संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. गावपातळीवर विकासकामांसाठी प्रत्यक्ष झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
नियुक्तीपत्राद्वारे आमदार भास्कर जाधव यांनी लांजेकर यांच्यावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
लांजेकर यांच्या नियुक्तीमुळे शृंगारतळी जिल्हा परिषद गटातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनात्मक कार्याला तसेच जनसंपर्काला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या नियुक्तीचे शृंगारतळी जि.प. गटासह गुहागर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.








