रत्नागिरी, दि. ७ : शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीईटी), पदोन्नती प्रक्रिया, संच मान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्ती आदी प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील आझाद मैदानासह सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांनी दिली.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघ, प्रहार संघटना, प्रोटान संघटना आदी संघटना सहभागी होणार आहेत. याबाबत शासनाला ३० जून रोजी नोटीस देण्यात आल्याचे संघटनांनी सांगितले.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पदोन्नती प्रक्रियेवरील स्थगिती मागे घेणे, २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी नियमांमध्ये शिथिलता देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देणे, १५ मार्च २०२४ चे संच मान्यता धोरण रद्द करणे तसेच प्राथमिक शिक्षकांना बीएलओसारख्या अशैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करणे या मागण्यांचा समावेश आहे.
शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून, ९ जुलैचे आंदोलन अपरिहार्य झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील अनेक शाळांमधील अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची जबाबदारी शासनावर राहील, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.








