चाकरमान्यांच्या परतीला एसटीचा मोठा आधार; रत्नागिरीतून २,५०७ जादा बस

रत्नागिरी विभागाचे नियोजन; रविवारसाठी तब्बल १,६६१ बस सज्ज

रत्नागिरी, दि. १८ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईसह राज्यातील विविध शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागातून तब्बल २ हजार ५०७ जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शनिवारसाठी २३७ जादा बसचे नियोजन करण्यात आले असून, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तब्बल १ हजार ६६१ बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर सोमवार, २१ सप्टेंबर रोजी ४५७ जादा बस सोडण्यात येणार आहेत.

याशिवाय पुढील दिवसांसाठीही टप्प्याटप्प्याने जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर रोजी ५१, २३ सप्टेंबरला १९, २४ सप्टेंबरला १९, २५ सप्टेंबरला २२, २६ सप्टेंबरला २० आणि २७ सप्टेंबरला २१ जादा बस सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात येताना अनेक चाकरमान्यांनी एसटीच्या जादा गाड्या तसेच समूह आरक्षणाचा लाभ घेतला होता. आता परतीच्या प्रवासासाठीही एसटी महामंडळाच्या या विशेष नियोजनाचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

दरम्यान, कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे आरक्षण आधीच पूर्ण झाले असून, परतीच्या प्रवासासाठी रेल्वेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यातच काही खासगी प्रवासी वाहतूक सेवांच्याही अतिरिक्त गाड्या कोकणाकडे वळविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात जादा बसगाड्या उपलब्ध करून दिल्याने चाकरमान्यांना आपल्या परतीच्या प्रवासासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे.

गणेशोत्सवानंतरच्या गर्दीचा विचार करून रत्नागिरी विभागाने केलेल्या या विशेष नियोजनामुळे मुंबई, पुणे आणि अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे.

आणखी वाचा