प्राथमिक शिक्षिका सौ. ममता सिद्धार्थ जाधव ३८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

आबलोली, दि. ३० : गुहागर तालुक्यातील आबलोली पागडेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ. ममता सिद्धार्थ जाधव या ३८ वर्षे ९ महिन्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर ३० सप्टेंबर २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.

सौ. जाधव यांनी १७ डिसेंबर १९८७ रोजी आबलोली नंबर १ येथून आपल्या शैक्षणिक सेवेला सुरुवात केली. त्यानंतर खोडदे-मोहितेवाडी तसेच कुडली नंबर ३ या शाळांमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावली. सन २०१२ मध्ये त्यांची प्रशासकीय बदली चिपळूण तालुक्यातील फिरवली तर्फे वेळंब नंबर १ येथे झाली.

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत दररोज ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करून शाळेत जाणे-येणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. वृद्ध आई-वडील, शिक्षण घेणारी दोन मुले आणि केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले पती यांच्यासह घरातील जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी आपली सेवा अखंडपणे सुरू ठेवली. पती-पत्नीची एकत्र बदली व्हावी यासाठी प्रयत्न करूनही यश आले नाही. मात्र, परिस्थितीसमोर न डगमगता त्यांनी जवळपास सात वर्षे धैर्याने सेवा बजावली.

एप्रिल २०१९ मध्ये त्यांची आबलोली पागडेवाडी शाळेत बदली झाली. याच शाळेतून त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेला विराम दिला.

सौ. ममता जाधव या जिद्दी, मेहनती आणि सामाजिक जाणिवा जपणाऱ्या शिक्षिका म्हणून परिचित आहेत. पती शिक्षक संघटना तसेच बामसेफच्या सामाजिक कार्यात सक्रिय असताना त्यांनीही त्यांच्या कार्याला सातत्याने सहकार्य केले.

दरम्यान, आबलोली केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात आबलोली केंद्राच्या केंद्रीय प्रमुख सौ. पल्लवी पवार, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांच्या वतीने सौ. ममता जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आणखी वाचा