खेड, दि. ७ : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी आणखी एक दुर्दैवी घटना घडली. खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण भूस्खलन होऊन एका घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून बेपत्ता असलेल्या सतीश शांताराम शेलार (३०) आणि शांताराम बलराम शेलार (८४) यांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांनी शोधून काढले.
अचानक झालेल्या भूस्खलनामुळे शेलार कुटुंबाचे घर काही क्षणांत माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यात कल्पना शांताराम शेलार (७३) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.
मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सतीश शेलार आणि शांताराम शेलार यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर कठीण परिस्थितीत मोहीम सुरू ठेवली. मुसळधार पाऊस, चिखल आणि अंधारामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. तरीही जवानांनी अत्यंत दक्षतेने ढिगारा हटवून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. आवश्यक पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी पहाटेच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला धोकादायक परिसरातील कुटुंबांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री सामंत यांनी कशेडी परिसरातील भूस्खलनग्रस्त भागाचीही पाहणी केली. डोंगरकड्यांच्या पायथ्याशी किंवा दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याचबरोबर खेड व चिपळूण परिसरातील पूरस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. वाशिष्ठी आणि जगबुडी नद्यांमधील गाळ उपशाच्या कामांमुळे यंदा पावसात नदीपात्रातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








