मुंबई/ठाणे, दि. २७ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना मोठा फटका बसला असून, पेपरफुटीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून, सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, टीईटी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, शनिवारी भिवंडी परिसरात टीईटीच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता प्रश्नपत्रिकांचे संच जप्त करण्यात आले. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर जप्त प्रश्नसंचातील काही प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात राजीव शाह (बिहार), आकाश कुमार (बिहार) आणि धीरज सिंग (हरियाणा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते. सुमारे दीड कोटी रुपयांत प्रश्नपत्रिकेचा व्यवहार होणार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, स्थानिक संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अनेक उमेदवारांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. अनेक जण परीक्षा केंद्रांच्या शहरात पोहोचले होते, तर काहींनी प्रवास व निवासाची व्यवस्था केली होती. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पेपरफुटीच्या या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, “ही केवळ पेपरफुटी नाही, तर तरुणांच्या भविष्याची चोरी आहे. देशातील परीक्षा व्यवस्था खंडणीखोरीचे रॅकेट बनली आहे,” अशी टीका केली.
आमदार रोहित पवार यांनी, “या सरकारचा जन्मच फोडाफोडीतून झाला आहे. त्यामुळे पेपरफुटी रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, “पेपरफुटी हा आता अपवाद नसून सरकारची ओळख बनली आहे. या रॅकेटला राजकीय संरक्षण कोणाचे आहे?” असा सवाल उपस्थित केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या रोहिणी खडसे, युवाशाही असोसिएशनच्या अश्विनी कडू आणि मनसेचे गजानन काळे यांनीही परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली.
यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देताना, “घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे सांगितले. तर परीक्षा परिषदेच्या उपआयुक्त प्रिया शिंदे यांनी, “उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.
टीईटी पेपरफुटीच्या या घटनेमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलीस आणि राज्य परीक्षा परिषदेकडून सखोल तपास सुरू आहे.








