ठाणे, दि. 3 (जिमाका) – “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून ठाणे जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही प्रशासकीय क्लिष्टता न आणता सुलभता आणावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त भगिनींचा यामध्ये सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांची बैठक घेतली व योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने करावयाच्या तयारीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
श्री. शिनगारे म्हणाले की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे, त्यांची नोंदणी करून घेणे व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे, यासाठी सर्वच विभागांनी व्यवस्था करावी. तहसिलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रात मंडळनिहाय यासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करावे. या योजनेसाठी लागणारे दाखले नागरिकांना मिळण्यासाठी तहसिलदारांनी योग्य त्या सुविधा निर्माण कराव्यात. प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींना एकत्रित कामे वाटून द्यावीत व जबाबदारी निश्चित करावी. शहरी भागात प्रत्येक प्रभाग कार्यालयात यासाठी सुविधा निर्माण कराव्यात. योजनेत सहभागासाठी कोणत्याही भगिनीला अडचण येणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
ठाणे जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच आदिवासी, ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी भागातील महिलांपर्यंत ही योजना पोहोचवून त्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी सर्वच विभागांनी काटेकोर नियोजन करावे. तसेच रोज होणाऱ्या नोंदींचा अहवाल द्यावा. तसेच यासंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पडेस्क तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.
येत्या जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील 90 टक्के नोंदणी पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे. तसेच पुढील महिन्याभरात आणखी काही महिला वंचित राहतात का, याची तपासणी करून जास्तीत जास्त महिला भगिनींची नोंदणी करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना ही राज्यातील वंचित, परित्यक्त्या, आर्थिक दुर्बल महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे या योजनेची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांची नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, ही कामे महत्त्वाची आहेत. हे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण घेऊन कामाचे नियोजन करावे. त्यासाठी बीटनिहाय यंत्रणा उभारावी. महिला बचतगट, महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, महापालिकांचे कर विभाग, महसूल यंत्रणा या सर्वांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे असणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी सांगितले.
आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने दाखले देणे, आवश्यक असल्यास ऑनलाईन नोंदणी करणे आदी कामे करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्री. ठोंबरे यांनी दिले.
महिला व बालविकास अधिकारी श्री. महेंद्र गायकवाड यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी तसेच महिला बचतगट, एकात्मिक बालविकास अधिकारी यांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले.








