मुंबई, दि. १७ : “पैशासमोर निष्ठा कशी ताठ मानेनं उभी राहू शकते, हे शिवसैनिकांनी दाखवून दिलं आहे,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालानंतर शनिवारी शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मुंबईत शिवसेनेचाच महापौर व्हावा ही आपली इच्छा आजही कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमची अपेक्षा अधिक जागांची होती, कारण गेली २५ वर्षे शिवसेनेने मुंबईची प्रामाणिक सेवा केली आहे. कोविड काळात ‘मुंबई मॉडेल’चं जगभरात कौतुक झालं. त्यामुळे मुंबईकरांकडून अधिक भरघोस आशीर्वाद मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेचे जे गड आहेत, त्या भागांतील मराठी माणसाने शिवसेनेवरील विश्वास आजही कायम ठेवला आहे.” यावेळी त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले.
महापालिकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युतीचे प्रतिनिधी महापालिकेतील गैरव्यवहारांचा भांडाफोड करतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “महापालिकेची तिजोरी कशी लुटली गेली आहे, हे आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. मुंबईची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जावी, यासाठी आम्ही सातत्याने दबाव ठेवू. जनतेसमोर मांडलेल्या वचननाम्याचा आम्ही नक्कीच पाठपुरावा करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत शिवसेनेचाच महापौर व्हावा, ही इच्छा अद्यापही कायम असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बहुमताचा आकडा आम्ही सध्या गाठू शकलो नाही. मात्र सत्ताधाऱ्यांच्या खेळाला उत्तर देत ‘शिवशक्ती’नं जे यश मिळवलं आहे, त्याने सत्ताधारी पक्षाला घाम फुटला आहे.” यावेळी त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या सभांचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली.
“मोदींची सभा शिवतीर्थावर झाली होती, तेव्हा खुर्च्या रिकाम्या होत्या, तरीही त्यांना मतं मिळाली. यावेळी मी आणि राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर एकत्र सभा घेतली, तेव्हा शिवाजी पार्क गर्दीनं तुडुंब भरलेलं होतं. आमच्याकडे गर्दी जमते, पण मतदान होत नाही; मात्र त्यांच्या बाजूने रिकाम्या खुर्च्याही मतदान करू शकतात. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करतात, हे एक न सुटलेलं कोडं आहे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सत्ताधारी पक्षाच्या विजयावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यांचा विजय डागाळलेला आहे.” त्यांनी आरोप केला की, राज्यातील महानगरपालिका निवडणुका सत्ताधारी पक्षाकडून अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं लढवल्या गेल्या. “जणू प्रत्येक निवडणूक ही त्यांच्यासाठी शेवटची लढाई आहे, अशा पद्धतीनं त्यांनी प्रचार केला. ‘साम-दाम-दंड-भेद’ यापलीकडे जाऊन अफाट पैशांची लालूच दाखवली, विविध आमिषं दिली गेली. काही शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या, तर अनेकांना अटक झाली. काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्नही झाले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह इतर काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना पैशांची आमिषं दाखवण्यात आल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. “काही उमेदवारांना जबरदस्तीने उमेदवारी मागे घ्यायला लावण्यात आलं. मात्र ज्यांनी या आमिषांना भीक न घालता लढत दिली आणि ज्या मतदारांनी निर्भयपणे मतदान केलं, तेच या लोकशाहीचे खरे रक्षक आहेत,” असे सांगत त्यांनी शिवसैनिकांचे आणि मतदारांचे अभिनंदन केले.
पत्रकार परिषदेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युतीला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. “मी सर्व महापालिकांच्या प्रचाराला जाऊ शकलो नाही, तरी जिथं गेलो नाही, तिथल्या शिवसैनिकांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी केलेल्या संघर्षाला माझा सलाम आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.








