देवरुख, दि. १७ : वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका पक्षाचे निरीक्षक डॉ. सुशील सपकाळ यांनी मांडली. देवरुख येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभागात कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सपकाळ यांनी माहिती देताना सांगितले की, संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी तीन जागा, तर पंचायत समितीसाठी आठ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार देणार आहे. वंचित बहुजन आघाडी ही नेहमीच स्वबळावर निवडणूक लढत आलेली असून, पुढील काळातही हीच भूमिका कायम राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
ही पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या देवरुख येथील कार्यालयात शनिवारी दुपारी पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पक्ष निरीक्षक डॉ. सुशील सपकाळ, राज्य समिती सदस्य प्रशांत पासेकर, जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, जिल्हा सचिव सिद्धार्थ कांबळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र मोहिते, तालुका सचिव संतोष जाधव, उपाध्यक्ष दयानंद जाधव, सल्लागार श्रीपत मोहिते, उपाध्यक्ष अशोक मोहिते, उपाध्यक्ष दिलीप पवार, सहाय्यक सचिव रुपेश जाधव, बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जभा कदम, राहुल मोहिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सपकाळ म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी निर्माण झालेली संघटना नसून, शोषितांना खऱ्या अर्थाने शासक बनवण्याचा अधिकार मिळावा, यासाठीचा हा लढा आहे. वंचित समाजाच्या अस्तित्वाची लढाई आम्ही लढत आहोत. वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्वच वंचित समाजघटकांचा समावेश असून, प्रत्येक घटकासाठी सातत्याने संघर्ष केला जात आहे.”
वंचित बहुजन आघाडी ही कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसून, सर्व वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रतिनिधित्व करणारी चळवळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. “वंचितांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी, याच उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात जिथे जिथे शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे डॉ. सपकाळ यांनी सांगितले.
आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे.








