मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे लाभार्थी होऊन जीवन सुखी व समृद्ध बनवा – प्राचार्य डॉ. भारत कराड

दापोली, दि. २३ (प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील वराडकर-बेलोसे महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या अभ्यासक्रमाची सुरुवात आज उद्बोधन वर्गाच्या माध्यमातून झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “मी या विद्यापीठाचा एक लाभार्थी आहे. आपण सुद्धा या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाचे लाभार्थी होऊन आपले जीवन सुखी व समृद्ध बनवा.”
त्यांनी शिक्षणाची महत्त्वता स्पष्ट करताना सांगितले की, “शिक्षण घेण्यासाठी कोणतीही वय नसते. शिक्षण कधीही आणि कोठेही पूर्ण करता येते आणि ते जीवनातील करियर व व्यवसायासाठी नक्कीच उपयुक्त ठरते.” मुक्त विद्यापीठाने गरीब, होतकरू आणि नोकरी करणाऱ्या पण शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सुविधा निर्माण केली आहे.
या उद्बोधन सत्राची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर केंद्र संयोजक प्रा. लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रास्ताविकात मुक्त विद्यापीठाची उद्दिष्टे, समंत्रक वर्गाचे वेळापत्रक, गृहपाठ, क्षेत्रीय प्रकल्प, नवीन शैक्षणिक धोरण आणि परीक्षा पद्धती याबद्दल माहिती दिली.
समंत्रक प्रा. एफ. के. मगदूम यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व आणि शिक्षण का घेणे आवश्यक आहे याबद्दल विचार व्यक्त केले. समंत्रक प्रा. एस. एस. खरात यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला समंत्रक वर्गास उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. दीपक गडकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. एम. एस. कांबळे, केंद्र सहाय्यक वैभव कुडवाळकर, तांत्रिक सहाय्यक मनोहर मोरे, संकेत घोलप, श्रीकांत पवार आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

आणखी वाचा