विद्यापीठात प्रथम क्रमांकाची मानाची कामगिरी; स्वप्नाली जोशी यांना ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्कार’

चिपळूण, दि. ७ : जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि मूल्यसंस्कारांच्या बळावर शिक्षिका स्वप्नाली जोशी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स (M.Lib. & I.Sc.) पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल विद्यापीठाच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त १ जुलै रोजी आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू प्रा. जोगिंदर विसेन यांच्या हस्ते स्वप्नाली जोशी यांना रोख रुपये १,००१, मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच प्रतिष्ठेचा ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

स्वप्नाली जोशी यांनी बाळासाहेब धुरी अध्यापक महाविद्यालयाच्या माध्यमातून श्रीराममंदिर वाचनालय, सावंतवाडी येथील अभ्यासकेंद्रात प्रवेश घेऊन एम. लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. अध्यापनाची जबाबदारी सांभाळत उच्च शिक्षण घेण्याचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. वेळेचे नियोजन, नियमित अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ध्येय फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना सन २०२६ चा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. अध्यापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

स्वप्नाली जोशी यांच्या या दुहेरी यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात प्रथम क्रमांक, ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्कार’ आणि ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ या मानाच्या सन्मानांमुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला असून, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह अध्यापन क्षेत्रातील शिक्षकांसाठीही त्यांच्या यशाने प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

आणखी वाचा