हातखंबा ते खेडशी भागातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

रत्नागिरी, दि. ०९ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मिऱ्या- नागपूर महामार्गावरील हातखंबा ते रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ता खोदण्यात आला आहे. या भागातील रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे चीखलमय झालेला रस्ता वाहनचालकांसाठी चांगलाच डोकेदुखी ठरत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे धुळीचा त्रासातून वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यातच ८ जानेवारी २०२४ रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊसाने हातखंबा ते खेडशी या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हे कळण्यास मार्ग नाही. मिऱ्या ते हातखंबा भागातील काम लवकरच परिपूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या या महामार्ग बांधणीच्या कामाचा वेग मंदावला आहे. सध्या या रस्त्यावरून दुचाकीचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डे ,चिखलाच्या साम्राज्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता आहे.

या भागातील चौपदरीकरणाची एक लेन पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र लेन पूर्ण होणे दूरच…ठिकठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने खोदाई करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या क्षेत्रातील काम रवी इन्फ्रा प्रायव्हेट लि. कंपनी मार्फत करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी या रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनपासून एक लेन टाकण्यास दोन दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. मात्र संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे अनेक अपघातही झाले आहे. संबधित विभागाचे या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

आणखी वाचा