
रत्नागिरी, दि. १६ : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागाने वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणयोग्य आणि अभिमानास्पद अशी कामगिरी करत ‘जायंट हर्निया’वरील अति-जटिल शस्त्रक्रिया अवघ्या एका तासात यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चिपळूण येथील सुभाष विष्णू चव्हाण (58) यांचा तब्बल २० किलोपर्यंत वाढलेला अंडाकोष सामान्य स्थितीत आणण्यात डॉक्टरांना यश आले. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या असह्य वेदनांपासून रुग्णाची सुटका करून या शस्त्रक्रियेनं वैद्यकीय कौशल्याचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
पाच वर्षांचा त्रास, असह्य वेदना – निदानात धक्कादायक चित्र
गेल्या पाच वर्षांपासून रुग्णाच्या अंडकोशाचा आकार सातत्याने वाढत होता. लघवी-विसर्जनाच्या क्रियेत तीव्र त्रास होत असल्याने 25 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी तपासणीत मोठे आतडे आणि मूत्राशय थेट अंडकोषात सरकल्याचे चित्र समोर आले. जांघ ते अंडकोष इतका विस्तार असलेले हे प्रकरण ‘जायंट हर्निया’चे दुर्मिळ उदाहरण होते.
यात आणखी अडचण म्हणजे रुग्णाचा नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब, ज्यामुळे शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता.
कठीण प्रकरणासाठी अभिनव तयारी – ‘प्न्यूमोपरिटोनियम’ प्रक्रिया
मोठे आतडे आणि मूत्राशय परत पोटात ढकलण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने, शस्त्रक्रियेआधी विशेषपूर्वक 31 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी ‘प्न्यूमोपरिटोनियम’ ही प्रक्रिया करून पोटात CO₂ गॅस भरून आवश्यक जागा तयार करण्यात आली. ही पूर्वतयारी नसती तर शस्त्रक्रिया करणे जवळपास अशक्य होते.
7 नोव्हेंबरला निर्णायक ऑपरेशन – तासाभरातील कौशल्यपूर्ण यश
7 नोव्हेंबर 2025 रोजी शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे व डॉ. मनोहर कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘इंग्विनल मेशोप्लास्टी’ ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अवघ्या एका तासात करण्यात आली. अतिदुर्मिळ श्रेणीतील या हर्नियाचे उपचार अत्यंत छोट्या चिरातून, अचूकता व कार्यक्षमतासह पूर्ण करून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाने शस्त्रक्रियेतील प्रावीण्य सिद्ध केले.
शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, लघवी-विसर्जनातील त्रास पूर्णतः नाहीसा झाला आहे. मोठा झालेला अंडाकोष आता पुन्हा सामान्य स्थितीत आहे.
डॉ. मनोहर कदम — तांत्रिक कौशल्याची ओळख
या यशामागे डॉ. मनोहर कदम यांचे कौशल्य, तांत्रिक प्रावीण्य, जिद्द आणि समर्पण अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांनी यापूर्वीही अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया हाताळल्या आहेत. त्यांच्या प्रवीणतेत —
अपेंडिसायटीस
हायड्रोसील दुरुस्ती
पित्ताशयातील खडे
कॉम्प्लेक्स व जायंट हर्निया
डायबेटिक फूट, गॅंग्रीन
गाठी, सूज, ट्यूमर
पाइल्स, फिशर, फिस्टुला
थायरॉईड आणि मान-घशातील गाठींच्या शस्त्रक्रिया
लॅप्रोस्कोपिक व एंडोस्कोपिक प्रक्रिया
या सर्व उपचारांमधील त्यांची गती, निर्णयक्षमता व टीमवर्क विशेष जाणवते.
प्रशासनाचे मार्गदर्शन आणि रुग्णालयाचा सन्मान
या शस्त्रक्रियेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, तसेच भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
अवघड परिस्थितीत प्रगत तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत केलेली ही शस्त्रक्रिया रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षमतेचा भक्कम पुरावा ठरली आहे. ही कामगिरी एक रुग्ण वाचवण्यापुरती मर्यादित नसून, जिल्हास्तरीय वैद्यकीय सेवांना राज्याच्या पातळीवर एक नवे स्थान देणारी ठरली आहे.








