खेड, दि. ३० : महिला बचत गटांमधील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासह त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित ‘सावित्रीबाई शहर वस्तीस्तर महिला बचत गट वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवा’चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
शिवतेज आरोग्य संस्था, तीनबत्ती नाका, खेड येथे हा कार्यक्रम पार पडला. महिला बचत गटांनी स्वतःच्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून तयार केलेल्या विविध आकर्षक व उपयुक्त वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळावी, कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या उद्घाटन सोहळ्याला नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, नगरसेवक निकेतन पाटणे, तौसीफ खोत, दीप्ती शिगवण, अंजुम कुरणे, आरती पवार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी महिला बचत गटांच्या उपक्रमाचे कौतुक करून महिलांनी उद्योग-व्यवसायात पुढे येत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले. या महोत्सवामुळे खेडमधील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे.








