महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आतापासूनच पाणी साठवणुकीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. कोकणात पडणारे पावसाचे पाणी वाहून समुद्राला मिळण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून जिरविणे गरजेचे आहे.
लांजा तालुक्यातील गावांमध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या परिसरातील छोटे ओढे, नाले, पऱ्या आणि नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यास मार्च ते मे या उन्हाळी कालावधीत पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता होऊ शकेल.
त्यामुळे लांजा तालुक्यातील प्रत्येक गावात किमान दोन ते तीन बंधारे मंजूर करून त्यांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि लांजाच्या तहसीलदार प्रियंका ढोले यांनाही देण्यात आल्या आहेत.








