रत्नागिरी, दि. ३० : ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १९ अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी गोळप-दाभिळवाडी आणि कोळंबे-बागवाडी येथील दोन नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.
फिनोलेक्स कंपनीच्या ४५ वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नूतनीकरणांतर्गत अंगणवाड्यांची बांधकाम दुरुस्ती, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, आकर्षक रंगकाम, माहितीपूर्ण बोलक्या भिंती, शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांचे स्वरूप अधिक सुंदर, स्वच्छ आणि बालमैत्रीपूर्ण झाले आहे.
बालकांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी प्रारंभिक शिक्षण महत्त्वाचे असल्याने या उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
लोकार्पणप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, अंगणवाडी पर्यवेक्षिका सावंत, फिनोलेक्सचे प्रकल्पप्रमुख नामदेव देशमुख, कारखाना व्यवस्थापक सागर चिवटे, विकास कुरतडकर, तसेच मुकुल माधव फाऊंडेशनचे शामराव निंबाळकर आणि वरद गोरे उपस्थित होते. स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थांनीही उपस्थिती दर्शवली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालशिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळत असून, फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.








