रत्नागिरीत पोलिसांची कारवाई : मिरकरवाड्यातून ‘गांजा’ जप्त, एक इसम ताब्यात

रत्नागिरी,दि. १६ : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याने मिरकरवाडा परिसरात गस्तीदरम्यान कारवाई करून एका इसमाकडून गांजा जप्त करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण ₹14,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली.

14 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस पथक मांडवी, पेठकिल्ला, मिरकरवाडा परिसरात पेट्रोलिंग करत असताना मलबार जेटीजवळील पडीक बोटीच्या कॅबिनजवळ एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला. हिरव्या रंगाची सॅक पाठीवर घेतलेल्या या इसमास थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पंचांच्या उपस्थितीत त्याची तपासणी करण्यात आली.

त्याने आपले नाव मोहनसिंग रामचंद्र भाट (वय 26), मूळ रा. भागेश्वर, डडेल्धूर–नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी असे सांगितले. सॅकची तपासणी केली असता काळ्या पिशवीत 300 ग्रॅम गांजा (पाने, फुले, काड्या, बिया) आढळला. त्यासह इतर मुद्देमाल मिळून एकूण ₹14,600 किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

मोहनसिंग यास ताब्यात घेऊन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु. र. क्र. 434/2025 नुसार NDPS Act 1985 कलम 8(क), 20(ब)II(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान त्याच्यावर यापूर्वीही गु. र. क्र. 419/2024 अमली पदार्थांचा गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पो.उनि. सागर शिंदे व पथकातील अंमलदार यांनी केली.

आणखी वाचा