राजापूर, दि. १७ : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, दिवसभर मोठी गर्दी आणि राजकीय हालचालींमुळे निवडणुकीचे वातावरण तापलेले दिसले. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर १० प्रभागांतील २० नगरसेवक पदांसाठी ६५ उमेदवारांचे ६९ अर्ज नोंदवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीकडून प्रभागनिहाय उमेदवारांची अधिकृत यादीही जाहीर करण्यात आली.
महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या चिन्हावर ॲड. हुस्नाबानू खलिफे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून सौ. श्रुती ताम्हनकर यांचे नाव निश्चित झाले, तर अपक्ष उमेदवार म्हणून भाजप महिला आघाडीच्या सौ. शितल पटेल तसेच सौ. जान्हवी करंगुटकर यांनी अर्ज दाखल केला. यापूर्वी हिंदू महासभेच्या सौ. ज्योती खटावकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून, अशा प्रकारे नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडीकडून नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय उमेदवारांची यादीही निश्चित करण्यात आली. प्रभाग क्रमांक १ मध्ये अरबाज खलीफे आणि समिक्षा बंडबे (काँग्रेस), प्रभाग क्रमांक २ मध्ये संगिता चव्हाण आणि अनिल कडाळी (शिवसेना उबाठा), प्रभाग ३ मध्ये विनय गूरव आणि नेहा तानवडे, प्रभाग ४ मध्ये गार्गी चिपटे (उबाठा) आणि सुभाष बाकाळकर (काँग्रेस), प्रभाग ५ मध्ये शबाना मूल्ला व सिद्धांत जाधव (काँग्रेस), प्रभाग ६ मध्ये ॲड. जमीर खलीफे आणि आफरोज झारी (काँग्रेस), प्रभाग ७ मध्ये आमीना गडकरी व सुलतान ठाकूर (काँग्रेस), प्रभाग ८ मध्ये श्रीकांत दुधवडकर आणि अनामिका जाधव (उबाठा), प्रभाग ९ मध्ये जान्हवी वादक (काँग्रेस) आणि सुबोध पवार (उबाठा), तर प्रभाग १० मध्ये नुरमहंमद मुजावर (काँग्रेस) आणि नसीमा याहू (उबाठा) यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
नगरसेवक पदासाठी एकूण ६५ उमेदवारांनी ६९ अर्ज दाखल केले असून, यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या ४० उमेदवारांसह २५ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सकाळपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात मोठी गर्दी केली होती. दुपारी तीनपर्यंत दाखल झालेल्या सर्व अर्जांची प्राथमिक नोंद घेऊन टोकन देण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत दाखल झालेल्या सर्व अर्जांची पूर्तता प्रक्रिया पूर्ण झाली.
निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहनिवडणूक निर्णय अधिकारी जयंत जावडेकर, निवासी नायब तहसिलदार विलास सरफरे, महसुल नायब तहसिलदार सायली गुरव, मृणालिनी शेळके, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव, तसेच इतर कर्मचारी दिवसभर परिश्रम घेत होते.
दरम्यान, निवडणुकीच्या तयारीदरम्यान आणलेल्या ईव्हीएम मशीनमुळे राजापूर शहरात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेसाठी आलेल्या ईव्हीएम मशीनवर ‘‘मध्यप्रदेश निवडणूक’’ असा उल्लेख आढळल्याने काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी जिल्हाधिकारी जिंदल यांच्याकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी ईव्हीएम सील करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. पेट्या उघडून पाहिल्यावर सर्व मशीनवर ‘‘मध्यप्रदेश निवडणूक’’ असा उल्लेख स्पष्ट दिसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यामुळे निवडणुकीची पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या विश्वसनीयतेबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, अर्ज माघारीची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. निवडणूक चिन्हांचे वाटप ২৬ नोव्हेंबरला होईल, तर नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.








