लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीसाठी सरकारची मोठी घोषणा; मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

मुंबई, दि. १७: राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेसाठी राज्य सरकारने मुदतवाढ जाहीर केली आहे. १८ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असताना, अनेक महिलांना नैसर्गिक आपत्ती व विविध कारणांमुळे ई-केवायसी पूर्ण करता न आल्याची दखल घेत महिला व बालविकास विभागाने ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यभर यशस्वीपणे राबवली जात असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. या योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व लाभार्थी महिलांनी वेळेत ई-केवायसी करणे आवश्यक असल्याचे त्या वारंवार सांगत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती, वाहतूक विस्कळीत होणे आणि स्थानिक अडचणी यामुळे अनेक पात्र महिलांना प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संवेदनशील भूमिका घेत ई-केवायसीसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही अतिरिक्त मुदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

तटकरे यांनी सांगितले की, ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, किंवा घटस्फोट झालेले आहेत, त्यांनी ई-केवायसीसोबत संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे. दस्तऐवज पूर्ण केल्यास त्यांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहील.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी महिलांनी वाढीव अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही तटकरे यांनी केले.

आणखी वाचा