मडगांव (गोवा), दि. ३०: मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र आणून व्यावसायिक सहकार्य, मार्गदर्शन व विकासासाठी कार्य करणाऱ्या मराठा बिझिनेसमन फोरम (MBF) गोवा चॅप्टरचे उद्घाटन आज गोव्यातील दोना पावला (Dona Paula) येथे पार पडले. स्वर्गीय अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे हा कार्यक्रम अत्यंत साध्या व शांत वातावरणात आयोजित करण्यात आला होता.
या उद्घाटन समारंभास मराठा बिझिनेसमन फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पुणे, सातारा व रत्नागिरी येथील MBF चे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई येथून मराठा बिझिनेसमन फोरमच्या मुख्य कार्यकारिणीतील सदस्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून गोवा चॅप्टरच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी येथून नवलाईचे जितेंद्र सावंत, MBF अध्यक्ष समीर इंदुलकर, संतोष तावडे, ॲड. कार्तिकी शिंदे तसेच कणकवली येथून डॉ. शमिता बिरमोळे, ॲड. योगेश सावंत, राजेंद्र सावंत, व्हा. प्रेसिडेंट राजेंद्र घाग, पंकज घाग, राजेंद्र तावडे, प्रसाद कदम, अजय देशमुख, दिलीप देशमुख, अभिषेक सावंत, माधुरी गायकवाड, श्रीमती धनश्री पालांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हा कार्यक्रम गोव्यातील द इंटरनॅशनल सेंटर, गोवा येथे सायंकाळी पार पडला. गोव्यात व्यवसाय करणाऱ्या मराठा समाजातील अनेक उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी कर्नाटक येथून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री. जी. एच. मालोजी राव यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास ऐतिहासिक व प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले.
मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्यात व्यावसायिक सहकार्य वाढवणे, नव्या उद्योजकांना मार्गदर्शन करणे आणि उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे हे मराठा बिझिनेसमन फोरमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गोवा चॅप्टरच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर नेटवर्किंगची संधी मिळणार असून, समाजाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
गोवा येथील अनेक मराठा उद्योजकांनी या वेळी मोठ्या प्रमाणावर MBF चे सभासदत्व स्वीकारले. त्यामुळे गोवा चॅप्टरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या उद्घाटनामुळे मराठा बिझिनेसमन फोरमच्या कार्याचा विस्तार गोव्यातही सुरू झाला असून, भविष्यात विविध व्यावसायिक उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे आणि उद्योजकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.








