चिपळूण, दि. १६ : तालुक्यातील गोवळकोट गावाशी नाळ जोडलेली कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या फातिमा खालिद मुकादम हिने आज Qatar Senior Women’s Cricket Team साठी पदार्पणाचा सामना खेळत इतिहास रचला आहे.
मध्यमगती गोलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी करणारी फातिमा केवळ १५ वर्षांची असून, इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळवणारी ती चिपळूण परिसरातील पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे चिपळूणचे नाव जागतिक क्रिकेट मंचावर उज्वल झाले आहे.
फातिमाचे वडील कॅप्टन खालिद मुकादम यांचे मूळ गाव गोवळकोट, चिपळूण असल्याने हा यशस्वी क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चिपळूण शहरासाठी अभिमानास्पद ठरतो. लहान वयात मिळवलेले हे मोठे यश तिच्या उज्ज्वल भविष्यातील क्रीडा कारकिर्दीचे संकेत देणारे आहे.
फातिमाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल चिपळूण शहरासह तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत ती भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
फातिमा मुकादम हिचे हे यश चिपळूणच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून मुलींसाठी क्रीडा क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करणारे ठरले आहे.







