डेरवण युथ गेम्समध्ये ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीचे उल्लेखनीय यश

सावर्डे, दि. ०७ : डेरवण येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीतील ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीने उल्लेखनीय यश संपादन केले. डेरवण युथ गेम्स यांच्या वतीने आणि Maharashtra State Amateur Aquatic Association यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून २०० हून अधिक जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीकडून सुमारे २५ जलतरणपटूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे रत्नागिरीमधून सर्वाधिक स्पर्धक याच अकॅडमीचे होते. उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीने एकूण १३ पदके मिळवत ‘बेस्ट अकॅडमी इन रत्नागिरी’ हा मान मिळवला.

या सर्व खेळाडूंना NIS प्रमाणित प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे सातत्यपूर्ण व तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली.

स्पर्धेत क्रिशांग पखाले याने २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक, तर १०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक मिळवले. तसेच ४×५० मीटर फ्रीस्टाईल रिले स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले.
आज्ञा शिंदे हिने ४×५० मीटर मिक्स फ्रीस्टाईल रिले आणि ४×५० मीटर मिक्स मिडले रिले स्पर्धेत रौप्यपदके मिळवली.
जतीन भोसले याने ४×५० मीटर मिक्स फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत रौप्यपदक, तर रुद्र सरफरेहर्ष शेलार यांनी ४×५० मीटर मिक्स मिडले रिले स्पर्धेत रौप्यपदके मिळवून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

याशिवाय ट्रिया तबिटा राकेश विलणकर (वय ४.५ वर्षे) या चिमुकलीने ५० मीटर फ्रीस्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत धाडसी सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एवढ्या लहान वयात स्पर्धेत उतरल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

या यशाबद्दल विजेत्या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीने १३ पदके जिंकत रत्नागिरीतील सर्वोत्तम अकॅडमी म्हणून आपली ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे.

आणखी वाचा