रत्नागिरी, दि. १३ : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन घरगुती गॅस पुरवठ्याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी एजन्सी व्यवस्थापन तसेच ग्राहकांशी संवाद साधत गॅस पुरवठ्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत गॅस सिलेंडर मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी एजन्सीच्या कामकाजाची तपासणी करताना ग्राहकांच्या अडचणी जाणून घेतल्या. गॅस बुकिंग संदर्भातील माहिती स्पष्टपणे दिसेल असा फलक एजन्सीच्या दर्शनी भागात लावावा, अशा सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिल्या. तसेच ग्राहकांकडून येणारे फोन वेळेवर स्वीकारून त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन करावे आणि बुकिंगची प्रलंबित यादी कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरत आहेत. काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो, अशी माहिती प्रसारित होत आहे. मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार प्रत्येक ग्राहकाला २५ दिवसांच्या आत घरगुती गॅस सिलेंडर मिळाला पाहिजे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
एजन्सीमध्ये उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात येणार असून त्यामुळे गॅस वितरणाची प्रक्रिया अधिक सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांमुळे घाबरून न जाता संयम ठेवावा आणि अडचणी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच नागरिकांनी सिलेंडर बुकिंगसाठी गॅस एजन्सींच्या व्हॉट्सअॅप क्रमांकांचा वापर करावा. यासंदर्भातील माहिती ग्राहकांच्या गॅस बुकमध्ये देण्यात आली असून सर्व एजन्सींनी दर्शनी भागातही ती माहिती प्रदर्शित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अडचण असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ७०५७२२२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.
गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ मदत
आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस ग्राहकांना गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपले ‘सरकार सेवा केंद्रांनी’ मदत करावी. याबाबत काही समस्या उद्भवल्यास संबंधित आपले सरकार सेवा केंद्राला जबाबदार ठरवण्यात येईल. याची नोंद घ्यावी, अशी सूचना उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजीत गाताडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात काही कारणास्तव गॅस टंचाईचा प्रश्न उद्धभवत आहे, अशा तोंडी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयास तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांना गॅस वितरकाकडे गॅस बुकिंग नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागल्याने गॅस वितरक व ग्राहकांचा वेळ जात आहे. याची दखल जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतली असून, आपले सरकार सेवा केंद्रांनी जिल्ह्यातील नागरिकांना गॅस नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी मदत करावी, असे त्यांनी निर्देश दिले आहेत.








