मुंबई, दि. २१ : नाशिकमध्ये अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगणारा अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरातचे विविध राजकीय नेत्यांशी असलेले संबंध समोर येत असून, या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मंत्र्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्याची मागणी जोर धरत आहे.
खरातसोबत पाद्यपूजा करतानाचे फोटो समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. वाढत्या दबावामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत आपला राजीनामा सादर केला. दरम्यान, चाकणकर या एकट्याच नसून राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे खरातसोबत संबंध असल्याचे फोटो आणि माहिती समोर येत आहेत.
नोव्हेंबर 2022 मध्ये अशोक खरात प्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्र्यांनी मंदिर भेट दिल्यानंतर अनेक नेते त्याच्या संपर्कात आल्याची चर्चा होती. राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या काळात भविष्य जाणून घेण्यासाठी या भेटी घेतल्या जात असल्याचेही बोलले जात होते. यावरून त्यावेळी शरद पवार यांनीही प्रश्न उपस्थित केले होते.
दरम्यान, पोलिसांनी खरातविरुद्ध बलात्कारासह अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मुलाच्या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले असून, त्यात विविध पक्षांचे नेते उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देताना, सार्वजनिक जीवनात अनेकांशी संपर्क येत असतो, मात्र गुन्हेगारांना पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले.
या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये किमान 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. यात इतर पीडित महिला किंवा संबंधित नेटवर्कचा समावेश आहे का, याची चौकशी सुरू आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत, “खरातच्या संपर्कातील सर्व नेते आणि मंत्र्यांचे CDR तपासले पाहिजेत. त्याच्याकडे असलेली संपत्ती आणि मिळालेला राजाश्रय पाहता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप केला आहे.
दरम्यान, शिर्डी परिसरात खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे. निघोज, निमगाव आणि शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात भूखंड असल्याची माहिती सातबारा उताऱ्यांतून समोर आली आहे. शिर्डी-निघोज मार्गालगत सुमारे चार एकर शेती असून तिची किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तसेच विविध ठिकाणच्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे 7All Posts0 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे खरातचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक कनेक्शन किती खोलवर आहेत, याबाबत संशय व्यक्त केला जात असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरातून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी होत आहे.








