भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी; संबंधित टँकर लोटे एमआयडीसी परिसरातील वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा असल्याचीही चर्चा

खेड, दि. २९ : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात रविवारी रात्री केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित टँकर लोटे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टँकर वादग्रस्त ठरलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा असल्याचीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. टँकरमध्ये नेमके कोणते रसायन होते किंवा तो भरलेला होता की रिकामा, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. केमिकल गळतीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना त्या भागापासून दूर ठेवण्यात येत आहे. तसेच अग्निशमन दलाचे पथकही तातडीने दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे.

दरम्यान, टँकर एका बाजूला पलटी झाल्याने सद्यस्थितीत महामार्गावरील वाहतूक प्रशासनाचे नियंत्रणाखाली सुरळीत सुरू आहे

या घटनेबाबत संबंधित प्रशासनाला माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत प्रशासन सतर्क राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा